देवरी तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवरी- भारतीय प्रजासत्ताकाचा ६७ वा वर्धापनदिन देवरी तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी मिलिंद टोणगावकर यांचे हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी तहसीलदार संजय नागटिळक उपस्थित होते. पोलिस पथकासह शहरातील विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. श्री टोणगावकर यांनी उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
पंचायत समिती देवरीच्या प्रांगणात पंचायत समितीच्या सभापती देवकी मरई यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस एम पांडे यांची उपस्थिती होती. पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. देवरी नगरपंचायतीचे ध्वजारोहण नगराध्यक्ष सुमन बिसेन यांनी मुख्याधिकारी चिखलखुंदे यांच्या उपस्थितीत केले. यावेळी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेकेंसह सर्व नगरसेवक आणि गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. तहसील कार्यालयातील ध्वजारोहण तहसीलदार संजय नागतिळक यांनी केले. पोलिस मुख्यालयातील ध्वजारोहण अप्पर पोलिस अधीक्षक संजय पखाले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. वनविभागाच्या कार्यालयातील ध्वजारोहण वनपरिक्षेत्राधिकारी मारबते यांचे हस्ते वनपरिक्षेत्राधिकारी रोशन राठोड यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वनपाल, वनरक्षक आणि वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील ध्वजारोहण वीज उपकेंद्रातील आवारात कार्यकारी अभियंता संजय वाकडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीतील सर्व अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवरीच्या दिवाणी न्यायालयातील ध्वजारोहण न्यायाधीश इंगळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विधीक्षेत्रातील मान्यवर आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलातील ध्वजारोहण सभापती देवकी मरई यांचे उपस्थितीत संस्थेचे सचिव झामसिंग येरणे यांचे हस्ते करण्यात आले. मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील ध्वजारोहण नगराध्यक्ष सुमन बिसेन यांचे हस्ते करण्यात आले. वंदना कन्या विद्यालयातील ध्वजारोहण मुख्याध्यापिका एस डब्ल्यू श्रीरामे यांचे हस्ते करण्यात आले. बाबूराव मडावी विद्यालयाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक राम गायधने यांचे हस्ते करण्यात आले.
मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी डॉ. पटले यांचे उपस्थितीत रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य दीपक पवार यांचे हस्ते करण्यात आले. तालुक्यातील इतरही ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

ब्लासम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनीने फडकावला तिरंगा
आपले राष्ट्रीय प्रतिके, राष्ट्रीय सणांचे महत्त्व आणि राष्ट्रनिष्ठा या विद्यार्थी दशेतच बालकात रूजवून देशभक्ती अंगात भिणवण्याच्या कल्पनेतून देवरीच्या ब्लासम पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी यावर्षी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची संकल्पना अमलात आणली. तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जाते. याचाच एक भाग म्हणून या विद्यालयातील ध्वजारोहण यावर्षीची सर्वोत्कृष्ठ विद्यार्थिनी अवनी पनपालिया हिच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कॅनरा बॅंकेच्या व्यवस्थापिका पूनमलता, संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल आणि मुख्याध्यापक सुजीत टेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.