गडचिरोली,दि. 27: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या या आसेतू हिमाचल अशा देशाला सार्वभौम प्रजासत्ताक घोषित केले तो दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन होय. या प्रजासत्ताकाच्या भविष्यातील वाटचालीत आपल्यातील प्रत्येकजण पुढाकार घेईल व आपल्या कर्तव्यांचे पालन करेल, अशी अपेक्षा पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केली.
येथील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा झाला. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यानंतर पोलिस दल तसेच गृहरक्षक दलाची सलामी त्यांनी स्वीकारली.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा रंगत गेला. प्रथमच याचे लाईव्ह प्रक्षेपण फेसबुकच्या माध्यमातुन करण्यात आले.
अम्ब्रिशराव आत्राम पुढे म्हणाले, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले असे ज्ञात- अज्ञात देशभक्त आणि हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमारेषेवर प्राणांचे बलिदान देणारे जवान व नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले पोलिस दलाचे जवान यांना या प्रसंगी मी मन:पूर्वक श्रध्दांजली आजच्या प्रसंगी अर्पण करतो. तसेच प्रजासत्ताक दिन चिरायू होवो या सदिच्छांसह आपणास हार्दीक शुभेच्छा देतो.या मुख्य शासकीय सोहळयास जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सीआरपीएफचे महानिरीक्षक दिनेश उनियल, सहायक कमांडंट दीपककुमार साहू व मनोजकुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती.संचलनानंतर गृह विभागाकडून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सन २०१४-१५ मध्ये वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणाऱ्या बातमीदारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार नरेश काशिराम बावणे यांना रोख १ लाख रुपये व सन्मानपत्र तर जिल्हास्तरीय पुरस्कार मुक्तेश्वर म्हशाखेत्री यांना २५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार व प्रमोद गेडेकर यांना १५ हजार रुपयांचा व्दितीय पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त स्काऊट गाईड्सच्या आठ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये सूरज प्रमोद थोरात, कु. मृणाल प्रवीण मोडक, कु. आचल मनोहर ढोके, कु. प्रज्ञा जगन्नाथ जांभुळकर, कु. रोशनी विठ्ठल दुधबळे, कु. चेतना संजय भोयर, कु. रश्मी वसंत वालके, कु. पोर्णिमा पुंडलीक चौधरी यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय क्रीडा स्कॉय मार्शल आर्ट स्पर्धा हरियाणा मध्ये झाली यात विजयी झालेल्या कु. एंजल देवकुळे व रज्जत सेलोकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सहायक क्रीडा अधिकारी मदन टापरे, गोंडवाना विद्यालयाचे शिक्षक ओमप्रकाश संग्रामे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले.
कार्यक्रमाला परिसरातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.





