ग्रामसभा लढविणार जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक

0
15
Exif_JPEG_420

गडचिरोली,दि.३: विविध इलाख्यांतील ग्रामसभांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, धानोरा व कोरची तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या ६ जागांवर उमेदवार उभे केल्याची माहिती ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मोहगाव ग्रामसभेचे सभासद बावसू पावे, पेंढरीचे राजकुमार आतला, पुलखलचे करणसिंह उसेंडी, सोनी भगत, लता पावे, रोहिदास कुमरे, प्रशांत पेदापल्लीवार, वसंत पोटावी, सीताराम नरोटे, मनकेर नरोटे, रैनू वड्डे, लालाजी उसेंडी, हरिदास पदा, सावजी कुमोटी उपस्थित होते.
बावसू पावे यांनी सांगितले की, कोरची, टिपागड, मुरुमगाव, खुटगाव व झाडापापडा इत्यादी इलाख्यांतील ग्रामसभांनी धानोरा व कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. बेकायदा प्रस्तावित खाणी रद्द कराव्यात, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, गाव गणराज्य संकल्पनेचा शासनाने स्वीकार करावा व अन्य अशा ११ बाबींचा समावेश असलेला जाहीरनामा ग्रामसभांनी जाहीर केला आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना इत्यादी पक्षांनी पेसा कायद्याला विरोध करुन आदिवासी विरुद्ध गैरआदिवासी असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच आदिवासी भागातील जनता खाणींना विरोध करीत असताना प्रमुख राजकीय पक्षांचे लोक गप्प बसले. त्यामुळे ग्रामसभांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या ६ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणाही करण्यात आली.
पेंढरी-गट्टा जिल्हा परिषद क्षेत्र- रामदास जराते, चातगाव-कारवाफा- बाजीराव उसेंडी, मुस्का-मुरुमगाव- छाया पोटावी, कोटरा-बिहिटेकला- रामसुराम काटेंगे, बेळगाव-कोटगूल- रदीमबाई नंदकिशोर वैरागडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंचायत समिती गणातील पेंढरी-लता पावे, गट्टा-सुनीता पदा, कोटरा-पंचशीला बोगा, बिहिटेकला-सावजी बोगा, बेळगाव-कल्पना नैताम, कोटगूल-आनंदराव टेंभुर्णे यांचा समावेश आहे.
सर्व ग्रामसभा या उमेदवारांचा प्रचार करणार असून, जनतेची जाण असणाऱ्या राजकीय पक्षांनी ग्रामसभांच्या उमेदवारांच प्रचार करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.