‘वसा विदर्भाचा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन थाटात
नागपूर दि.१५: भारतीय शिक्षण व्यवस्थेला फार जुना इतिहास असून आज जगामध्ये दुसर्या क्रमांकाची शिक्षण व्यवस्था आहे. जगातील अनेक विद्यापीठांचे संचालक हे भारतीय आहेत. मात्र, असे असले तरी तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये भारताला समोर जायचे असेल तर उच्च शिक्षणात नावीन्यपूर्ण बदल घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘परम’ सुपर कम्युटरचे निर्माते पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले.
डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा वसा घेऊन शिक्षणक्षेत्रात वाटचाल करणारे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्या गौरवार्थ ‘वसा विदर्भाचा’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लोकार्पण थोर तत्त्वचिंतक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते आणि माजी कुलगुरू डॉ. हरिभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली, मंगळवारी पार पडले. यावेळी डॉ. भटकर बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. शरयू तायवाडे,माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजीत मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, अनंतराव घारड, ज्येष्ठ समाजसेवी उमेशबाबू चौबे, बाळासाहेब सपकाळ उपस्थित होते.
खंबीर नेतृत्व, या शब्दात डॉ. भटकर यांनी डॉ. तायवाडे यांचा गौरव केला.धनवटे नॅशनल कॉलेज हे विदर्भातील एक प्रसिद्ध महाविद्यालय आहे. डॉ. तायवाडे यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे अनेकांना आज चांगले शिक्षण मिळत आहे.त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून भटकर म्हणाले, शिक्षण क्षेत्रातही भारतअग्रेसर होईल मात्र, नावीन्यता आधारित शिक्षण व्यवस्था उभारावी लागेल. हा कृतज्ञतेचा सोहळा असल्याचा उल्लेख करून डॉ. आ.ह. साळुंखे म्हणाले, महापुरुषांचा केवळ जयजयकार करणे पुरेसे नाही. संधी मिळाली की प्रयत्न केले तरच त्यातून गुणवत्ता प्राप्त होते. ज्याला संधी मिळाली त्याने मागे वळून पहावे व वंचितांना हात देऊन त्याच्याच उत्साह निर्माण करायला हवा. महापुरुषांसारखे होता येत नसले तरी त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी किमान चार पावले तर पुढे टाकू शकतो, असे ते म्हणाले.
श्रीपाद अपराजित म्हणाले, बबनराव म्हणजे समाजभान जपणारा माणूस. असा एकही वर्ग नाही जो त्यांना ताज्य नाही. नवअस्पृश्यतावाद त्यांच्या ठायी दिसला नाही. बबनरावांनी त्यांचे ‘स्किल’ राजकारणासाठी कधीच वापरले नाही. ते सतत लढले पण दंगा केला नाही, शक्तिप्रदर्शन केले नाही, कुणाशी पंगाही घेतला नाही, समोरचा मात्र थकून गेला, असे रणजित मेश्राम यांनी सांगितले. इतर वक्तांनीही गौरवोद्गार काढले.
कुणी स्तुती करावी, म्हणून कधीच काम केले नाही. संबंध जपण्याचा प्रयत्न केला. जो जुळला तो कधीच दूर केला नाही. लोक हीच माझी संपत्ती आहे. अनेक चांगली पदे भूषवायला मिळाली. पण, दुरुपयोग केला नाही व कुणाचा दबेलही राहिलो नाही, या शब्दात बबनरावांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी गं्रथाविषयी माहिती दिली. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. कार्यक्रमाला डॉ. बबनराव तायवाडे यांचा चाहता वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.





