तस्कराच्या विरोधात लढण्यासाठी मिळाले ९९ शस्त्र

0
14

गडचिरोली : राज्यातील जंगलांमध्ये होणारी वनतस्करी थांबविण्यासाठी वन विभागाने कंबर कसली असून वनकर्मचार्‍यांना शस्त्रास्त्र चालविण्याचे अद्यावत प्रशिक्षण देण्याबरोबरच वनविभागाने सुमारे १ हजार २२४ शस्त्रांचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड सीमेवर वनतस्करी वाढल्यामुळे गडचिरोली वनवृत्ताला ९९ शस्त्र पुरविण्यात आले आहेत.
वनतस्करी थांबविण्यासाठी वनविभागाने संपूर्ण राज्यात हजारो कर्मचारी व अधिकारी नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर गावातील नागरिकांकडून होणारी जंगलतोड थांबविण्यासाठीही कुर्‍हाडबंदी, गॅस शेगडी वितरण आदी अनेक योजना सुरूकेल्या आहेत. नागरिकांकडून सरपणासाठी होणारी जंगलतोड थांबविण्यात वनविभागाला अपेक्षित यश प्राप्त झाले असले तरी वनतस्करी मात्र तसुभरही कमी झाली नाही. उलट वनतस्कर शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून वनतस्करी करीत असल्याने वनविभागालाही शस्त्रखरेदी केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. वनविभागाने मागील चार वर्षात सुमारे ७१५ पिस्तूल व ५0९ रायफल खरेदी केल्या आहेत. सदर शस्त्रे चालविण्यासाठी ३ हजार ४७३ कर्मचार्‍यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. २0११ मध्ये १ हजार ७५७, २0१२ मध्ये १ हजार २९९ व २0१३-१४ मध्ये ४१६ कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
गडचिरोली वनवृत्तात ९९, चंद्रपूर वनवृत्तात ६५, नागपूर ११८, अमरावती ११0, यवतमाळ १0१, औरंगाबाद ७८, नाशिक ११0, धुळे १५३, ठाणे १३५, पुणे २२, कोल्हापूर ७६, वन्यजीव विभाग नागपूरला १२१ असे एकूण १ हजार २२४ शस्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. पोलिसांप्रमाणेच वनविभागसुद्धा शस्त्रसज्ज झाल्याने वनतस्करांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शस्त्रांच्या धाकामुळे वनतस्करीचे प्रमाण कमी होईल, अशी आशा वनविभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.