तुमसर-गावात नव्याने सार्वजनिक दिवाबत्ती मंजुर करणरे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. यात सिहोरा परिसरातील दोन गावांचा समावेश आहे. परंतु, या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. गावात विस्तारित वीज जोडणी करण्यासाठी तुमसर तालुक्यात ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात लंजेरा, देव्हाडी, आग्री, सोरणा, हसारा, रामपुर, आंबागड, हरदोली आ. देवणारा, मांडवी, सिलेगाव, सिंदपुरी, गोव्हारी टोला गावांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात बहुतांश गावात सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. हे दिवाबत्ती कर ग्रामपंचायतमार्फत वसुल केले जाते. ज्या गावात सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करण्यात आली नाही, अशा गावांनी जिल्हा परिषदेला प्रस्ताव दिले आहेत. यात सिहोरा परिसरातील गोंडीटोला, सुकळी नकुल गावांचा समावेश आहे. या गावांच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. काही गावात सार्वजनिक दिवाबत्ती असली तरी विस्तारीत वीज जोडणीचे प्रस्ताव अडले आहेत. खांबाला बल्ब लावून त्याच ठिकाणी बटन लावण्यात येत आहेत. सायंकाळ होताच बल्ब सुरू करतात आणि पहाटेला बंद करतात. दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सार्वजनिक दिवाबत्ती प्रस्तावित आहे. परंतु या वस्त्याचे प्रस्तावसुद्धा रखडले आहेत. संपूर्ण गाव अंधारात आहेत.
गावागावात तंटामुक्त गाव समिती आणि पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेतून सौर ऊर्जेवरील पथदिवे खरेदी करण्यात आले आहेत. गावातील चौकात आठ दिवसातच हे पथदिवे शोभेचे ठरले आहेत. पथदिवे दुरूस्ती करण्यासाठी सरपंचानी संबंधित एजन्सीला संपर्क साधूनही घोळ सुटलेला नाही. कुणी ऐकत नसल्याने सरपंचानी बंद पथदिव्याची अपेक्षा सोडली आहे. सौर ऊज्रेवरील पथदिव्याची फसगत तुमसर तालुक्यात अनेक गावे विस्तारीत आणि नवीन जोडणीपासून वंचित आहेत. गावे प्रकाशमय झाली पाहिजे. ज्या गावात अद्याप वीज जोडणी पोहचली नाही अशा गावांना प्राथमिकता देण्याची गरज आहे.
– कलाम शेख, सभापती,पंचायत समिती तुमसर.