24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ वेगळ्या विदर्भासाठी संघटित लढा उभारण्याची गरज- माजी मुख्यमंत्री अजित जोगी

वेगळ्या विदर्भासाठी संघटित लढा उभारण्याची गरज- माजी मुख्यमंत्री अजित जोगी

0
24

नागपूर दि. १६: स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी छत्तीसगड आणि तेलंगणापेक्षा जुनी आहे. ती राज्ये स्वतंत्र झाली. मात्र विदर्भ अद्यापही स्वतंत्र राज्य होऊ शकले नाही. त्यामुळे ही मागणी लावून धरण्यात काही तरी चुकत आहे. या मुद्यावर लढणार्‍या संस्था आणि पक्षांनी एकत्रित लढा उभारण्याची गरज छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी बुधवारी येथे एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केली.

जोगी म्हणाले, वैदर्भीय जतनेपुढे छत्तीसगड राज्याचे आदर्श उदाहरण आहे. अनंत अडचणींवर मात करीत आज राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. छत्तीसगड वेगळे झाले त्यावेळी राज्याचा अर्थसंकल्प ४ हजार कोटीचा होता. आज तो ८0 हजार कोटींचा आहे. पुढील अर्थसंकल्प कदाचित १ लाख कोटींचा असेल. थोडक्यात, गेल्या १६ वर्षांत विकासकामांवरील खर्चात २५ पटीने वाढ झाली आहे. पूर्वी छत्तीसगडमधील साधनांचा मध्यप्रदेशातील विकासावर खर्च होत असे. मात्र छत्तीसगड वेगळे राज्य झाल्याने ते बंद झाले आहे. विदर्भ वेगळा झाल्यास असेच विदर्भाच्या बाबतीतही घडेल.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विविध संघटना वेगवेगळ्या लढत आहेत. त्यामुळे, या संघटना आणि पक्षांनी एखादे फेडरेशन निर्माण करून एकत्रित लढा दिल्यास निश्‍चितच या लढय़ाला बळ मिळेल. वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहोत, अशी भूमिका घेऊन विदर्भात भाजपाने यश मिळविले. मात्र आता केंद्रात आणि राज्यात त्यांचीच सत्ता आहे. मात्र, शिवसेनेशी युती असल्याचे कारण देत भाजपा वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. यावरून भाजपाची नियत कळते.कदाचित नेतृत्व, संघटनांची शक्ती आणि लोक भावनेच्या कमतरतेमुळे वेगळ्य़ा विदर्भाची मागणी अद्यापही पूर्णत्वास जाऊ शकली नसावी, अशी शक्यता त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केली. विदर्भ राज्य होण्यासाठी आवश्यक जनजागृती अद्याप झाली नसावी. निवडणुकीच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याच्या अनुषंगाने लोक भावना निर्माण होईल, असे ते म्हणाले.

blank