नवी दिल्ली – आयआयटी दिल्लीचे डायरेक्टर रघुनाथ के. शेवगांवकर यांच्या राजीनाम्याच्या मुद्यात नाव आल्यानंतर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्वीटद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. आपण कोणतीही जमीन मागितली नसून अशा काल्पनिक बातम्या छापण्यापूर्वी एकदा माझ्याशी बोलायला हवे, असे सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आईआईटीचे डायरेक्टर शेगावकर यांनी त्यांच्या निवृत्तीच्या दोन वर्षांपूर्वीच अचानक राजीनामा दिला आहे. सचिनच्या क्रिकेट अकादमीला जमीन देण्यासाठी आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे थकीत वेतन देण्यासाठी सरकारकडून दबाल आल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार आयआयटी दिल्लीच्या एका वरिष्ठ अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.
सचिनने याबाबत स्पष्टीकरण देताना ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझा कोणतीही अकादमी सुरू करण्याचा विचार नसून, मी कोणतीही जमीनदेखिल मागितलेली नाही. तर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे. हा अत्यंत दुःखद प्रकार असून सरकारने अशाप्रकारे संस्थांच्या कामात दखल देणे बंद करायला हवे, असे म्हटले आहे.
शेवगावकर करत होते विरोध…
आयआयटीच्या सुत्रांनुसार शेवगांवकर यांच्यावर या दोन प्रकरणांवरून मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात होता. पण त्या दोन्हीला शेवगावकर विरोध करत होते. एका वरिष्ठ अधिका-याच्या मते, शेवगावकर आयआयटीच्या परिसरात इतर कोणत्याही कामासाठी जमीन देण्यास विरोध करत होते. विद्यार्थ्यांसाठीची जमीन विद्यार्थ्यांसाठीच कामी यावी असे त्यांचे म्हणणे होते.
स्वामी मागत आहेत थकीत वेतन
सुब्रमण्यम स्वामी यांनी 1972 पासून मार्च 1991 दरम्यानचे वेतन 18 टक्के व्याजासह देण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी यापूर्वीच आयआयटी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळली होती. स्वामी यांनी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली नसल्याचे आयआयटीचे म्हणणे आहे. त्यानंतर स्वामी यांनी कोर्टात घाव घेतली होती. आयआयटीने स्वामी यांच्या याचिकेवर लक्ष न देण्याची विनंती कोर्टाला केली होती. पण कोर्टाने ती फेटाळली होती.