स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र विचाराधीन-बडोले

0
10

अर्जुनी/मोरगाव : जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दहावी व बारावी शिकलेल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमूख बनविण्याचे विचाराधीन आहे. नवबौद्ध व्ही.जे. एन.टी. प्रवर्गातील या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळू शकतो. जिल्ह्यात स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र विचाराधीन असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ते भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी, मंत्रीपद मिळाले हा माझा नाही तर जनताजनार्दनाचा सन्मान आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्याचा प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येणार. यासाठी शेतकऱ्यांनी हिरमुसून जाऊ नये, असा दिलासा शेतकऱ्यांना दिला. राज्य सरकारवर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने तिजोरीवर दरोडा टाकून आर्थिक व्यवस्था खोकली केली. २६ जानेवारीपर्यंत एक शिबिर घेऊन जास्तीत जास्त लोकांना वनजमिनीचे पट्टे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोेलणी झाली असल्याचेही सांगीतले.

तसेच झाशीनगर उपसा सिंचन योजनेचा एक टप्पा मार्चपर्यंत पूर्ण होणार व येत्या तीन ते चार महिन्यांत या योजनेचे पाणी नवेगावबांध तलावात पडेल. तर बोंडगावदेवी पर्यंतच्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कलपाथरी सिंचन प्रकल्प, उपाशा नाल्याचा वनजमिनीचा प्रश्न, डव्वा मायनर, जुनेवानी तलावासाठी निधीची तरतूद, १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्राचा प्रस्ताव, अर्जुनी मोरगाव तालुक्यासाठी १०० विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेचा प्रस्ताव या विषयांवर सुद्धा सातत्याने अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असून हे सर्व प्रश्न निकाली काढू असेही ते म्हणाले. समाजकल्याण विभागाचे जिल्हा व राज्य असे दोन भाग आहेत. यात अनेक आश्रमशाळा, वस्तीगृहांचा समावेश असतो. वस्तीगृहाचे निरीक्षणच होत नाही. भविष्यात यासाठी तालुकास्तरापर्यंत कर्मचारी नेमून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मंचावर माजी आ. दयाराम कापगते, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, प्रभारी तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प.चे बांधकाम व अर्थ सभापती प्रकाश गहाणे, पं.स.चे सभापती तानेश ताराम, जि.प.चे समाजकल्याण सभापती कुसन घासले, कृउबासचे सभापती काशिम जमा कुरेशी, नामदेव कागपते, अ‍ॅड. दिलीप कातोरे, प्रमोद लांजेवार, जि.प.सदस्य मधुकर मरस्कोल्हे, अरविंद शिवणकर, रुपाली टेंभुर्णे, लुनकरण चितलांगे, सरपंच किरण खोब्रागडे, दिलीप चौधरी, केवळराम पुस्तोडे, उमाकांत ढेंगे उपस्थित होते.

याप्रसंगी खा. पटोले म्हणाले, आता आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेचे ऋण फेडायचे आहे. तालुक्यात सिंचन, रोजगार, शेतकरी, बेरोजगार व जातीधर्माचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेस -राकाँ सरकारने आमचे हक्काचे पाणी अदानीला विकले. शेतीला सिंचन व शेतीवर आधारीत उद्योग निर्मिती यासाठी प्रयत्न केले जातील. सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांची चमू आणली पाहिजे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. संचालन रचना गहाणे यांनी केले.