नगरसेविका गार्गी चोपरा यांचा राजीनामा

0
16

नागपूर दि. 4 –: काँग्रेसच्या प्रभाग १० मधील नगरसेविका गार्गी चोपरा यांनी शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा स्पीड पोस्टने महापालिका आयुक्त, मावळते महापौर प्रवीण दटके व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना पाठविला. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. चोपरा यांनी मात्र आपण व्यक्तिगत कारणाने राजीनामा देत असल्याचे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
प्रभाग १० मध्ये काँग्रेसने चारही जागा जिंकल्या होत्या. चोपडा (१०९८१ मते )यांच्यासह साक्षी राऊत (९४५६ मते), रश्मी धुर्वे (९५७७मते) व नितीश ग्वालबन्सी (९०८४ मते) विजयी झाले होते. चोपडा यांनी ४४८६ मतांनी विजय मिळविला होता तर ग्वालबन्सी हे फक्त ६८ मतांनी विजयी झाले होते. ग्वालबन्सी यांना राष्ट्रवादीकडून लढलेले रमेश घाटोळे यांचा फटका बसला होता. एकाच पॅनलमध्ये असलेल्या या दोन उमेदवारांच्या मताधिक्यातील फरक चर्चेचा विषय ठरला होता.राजीनाम्याबाबत विचारणा केली असता गार्गी चोपडा यांचे पती डॉ. प्रशांत यांनी व्यक्तिगत कारणावरून राजीनामा देत असल्याचे सांगितले. राजकारणात मन भरले आहे, असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.