बँड पथकासह देवरी शहरात करवसुली मोहीम

0
8

देवरी दि.२१: थकीत कर वसुलीमुळे नगर विकासावर होणारे परिणाम टाळण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी करवसुलीला घेऊन जनजागृतीचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. वाजागाज्यात नगरपंचायत कर्मचार्‍यांची मोहीम काढून करवसुली अभियान राबविला जात आहे. प्रत्येकाच्या दारावर वाजागाज्याने न.पं. प्रशासन पोहोचत असल्याने वसुली अभियानालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याचबरोबर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या या कर्तव्याचे कौतुकही केले जात आहे.
जिल्ह्यातील देवरी ही नगर पंचायत नव्याने स्थापित झालेली आहे. देवरी हे नगर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने उत्पन्न आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. देवरी येथे कुटुंब संख्या ३,७00 ऐवढी आहे. एक वर्षापूर्वी देवरी ग्रामपंचायत असल्याने ग्रा.पं. अधिनियमानुसार आजघडीला घरकर व पाणीपट्टीकरची आकारणी आहे. असे असले तरी देवरी नगरपंचायतीचे विकास थकीत करवसुलीमुळे रखडले होते. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पदावर राजेंद्र चिखलखुंदे हे रूजू झाल्यापासून शासनाच्या निर्देशान्वये करवसुलीवर भर देत आहेत. १00 टक्के करवसुली व्हावी, या उद्देशाने मुख्याधिकारी चिखलखुंदे जनजागृतीसह विविध उपक्रम राबवित आहेत.
रविवार, १९ मार्च रोजी वाज्यागाज्यात ‘नगर पंचायत आपल्या दारी’ हे स्तुत्य उपक्रम हाती घेऊन करवसुली अभियान राबविण्यात आले. देवरी नगरात ५ हजार रुपयांहून अधिक थकीत करवसुली असलेल्यांच्या दारावर नगरपंचायत प्रशासनातील १५ ते २0 कर्मचार्‍यांनी जाऊन अभियान राबविला. दरम्यान, अभियानाच्या पहिल्याच दिवशी देवरी नगरपंचायतीला १0 करदात्यांकडून १ लाख रुपयाची वसुली प्राप्त झाली आहे. मुख्याधिकारी चिखलखुंदे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवरी नगरपंचायतीला घरकर व पाणीपट्टीकर असे एकूण ३४ लाख वसुली येणे भाग आहे. त्यानुरूप अभियान राबविण्यात येत आहे. १00 टक्के कर वसुली व्हावी यासाठी सर्व करदात्यांना कर भरणा करावे, असे कळविण्यात आले आहे; अन्यथा थकीत करदात्यांचे नाव प्रसिद्ध करू, असेही कळविण्यात आले आहे. त्यामुळे देवरी येथील नागरिक करवसुली अभियानाला सहकार्य करणार आहेत. अशीही आशा त्यांनी वर्तविली आहे. वाज्यागाज्यात राबविण्यात येणार्‍या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.