अंगणवाडी सेविकांचे ४८ तासाचे मुक्कामी आंदोलन

0
8

गोंदिया दि.२१: अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी या प्रमुख मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी यूनियन (आयटक) च्या वतीने संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने यूनियनच्या जिल्हा शाखेच्या वतीनेही स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयासमोर २0 आणि २१ मार्चपर्यंत ४८ तासाचे मुक्कामी आंदोलनाला सुरुवात करण्यात आले आहे. दरम्यान या निमित्त शेकडो अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे.
यूनियनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले असून सादर निवेदनानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कर्मचारी दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका १0 नापास यांना ७ हजार रुपये, १0 वा वर्ग पास यांना ७ हजार ५00 रुपये, १२ वा वर्ग पास असलेल्या सेविकेला ८ हजार रुपये, १२ वी डी.एड यांना ९ हजार, पदव्युत्तर बी.एड, एमएसडब्ल्यू इतर यांना ९ हजार ५00 रुपये तर मदतनीससाठी १0 वर्ग नापास असलेल्यांना ५ हजार २५0 रुपये, १0 वा वर्ग पास ५ हजार ६२५ रुपये, १२ वा वर्ग पास ६ हजार, १२ वी डी. एड यांना ६ हजार ३७५, पदव्युत्तर बी. एड ७ हजार १२५ रुपये प्रमाणे शिफारस लागू करण्यात यावी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी १२ टक्के कपात करण्यात यावे, अंगणवाडी काम अतिरिक्त दिले तर दररोज सेविका २00 रुपये मदतनिस १५0 रुपये देण्यात यावे, सेवानवृत्त सेविका मदतनीस यांची एकमुस्त पेंशन त्वरित द्यावे, मिनी अंगणवाडीला मदतनीस द्यावी, टी.एच.आर. बंद करून ताजे व गरम पोषण आहार देण्यात यावे, मानधन प्रवास भत्ता आहार बील वेळेवर देण्यात यावे, या मागण्याचा समावेश असून राज्य शासनाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
दरम्यान शासनाचे लक्ष केंद्रीत करून मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी सोमवार, २0 मार्च पासून ४८ तासाचे मुक्कामी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास १ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.अंगणवाडी सेविकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक