दारूची वाहतूक करणारे वाहन शासनाकडे जमा होणार-डॉ. अभिनव देशमुख

0
16

गडचिरोली दि.२१: अवैध दारू वाहतुकीस आळा बसविण्याकरिता वापरण्यात येणारी वाहने शासन जमा करण्याकरिता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम १०० व १०१ अन्वये कारवाई करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
होळी सणाच्या दरम्यान अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध जिल्ह्यात धडक मोहीम राबवून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोन चारचाकी वाहने जप्त करून १६ लाख रूपयांची अवैध दारू पकडली आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. सन २०१७ मध्ये १५ मार्च २०१७ पर्यंत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये ३६३ केसेस दाखल करून ४६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७२ लाख ८४ हजार ५२२ रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. कलम ९३ प्रमाणे ७५ आरोपींवर कलम ५६ प्रमाणे २ व एमपीडीए अ‍ॅक्ट १९८१ अन्वये एका आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी व मांडवखाल येथील परवानाधारक दारूविक्रेत्यांचे परवाने पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावानंतर गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.२०१६ मध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये १ हजार ५८६ केसेस दाखल करून १ हजार ९६३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ६ कोटी ३४ लाख ३६ हजार २८३ रूपयांचा माल जप्त करण्यात आला होता. कलम ९३ प्रमाणे २२५ आरोपींवर कलम ५६ प्रमाणे २२ जणांवर व एमपीए अ‍ॅक्टअंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली.