अंधश्रद्धेचे दुकान चालविणारे शासनकर्ते झाले

0
10

नागपूर दि.२१: अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व त्यावर दुकान चालविणारे शासनकर्ते होत आहेत. साक्षात लोकांवर शासन करण्यासाठी अंधश्रद्धेची नेमणूक केली जात आहे. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अतिशय कठीण झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या मासिकातील निवडक लेखांचा संग्रह असलेल्या ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ या तिसऱ्या खंडाच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोमवारी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना डॉ. मनोहर यांनी वर्तमान परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर विचार व्यक्त केले. आज अध्यात्माच्या नावावर समाजासमोर मोठा धोका निर्माण केला जात आहे. ईश्वर ही रूढी आहे, ते वास्तव नाही. ही रूढी माणसाने निर्माण केली. मात्र ही रूढी इतकी लोकप्रिय झाली की आज माणूस ती सोडायला तयार नाही. या देशातील लोकांचे मन धार्मिक, आध्यात्मिक, परंपरा, संप्रदायवादी व मूलतत्त्ववादी आहे. लोकांना यातच गुरफटून ठेवण्यासाठी आणि माणूस होण्याचा मार्ग रोखणारी आयुधे निर्माण केली गेली आहेत. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक जोखिमीचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली