जिपच्या शिक्षण विभागात ४२१ पदे रिक्त

0
17

भंडारा-शिक्षणाच्या बाबतीत शासनाकडून कितीही तत्परता दाखविली जात असली तरी रिक्त पदे आणि इतर गोष्टींमुळे विद्यार्थ्यांची होणारी अडचण अजूनही दूर झालेली नाही. येथील जिपच्या प्राथमिक शिक्षण विभागात आज तब्बल ४२१ पदे रिक्त असून इयत्ता १ ते ५ चे विषय शिकवणार्‍या शिक्षकांना ६ ते ८च्या विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी जिप सभापती अरविंद भालाधरे यांनी शालेय शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे केली आहे.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची नेहमीच वानवा असते. वरवर सर्वकाही ठिक वाटत असले तरी विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मंजूर पदे नेहमीच भिन्न असतात. येथील प्राथमिक शिक्षण विभागात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, मुख्याध्यापक, उच्चश्रेणी शिक्षक, निम्नश्रेणी शिक्षक, विस्तार अधिकारी कनिष्ठ व वरिष्ठ, प्रयोगशाळा सहायक व परिचर, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक असे एकूण ४२१ पदे आज रिक्त आहेत. इयत्ता ६ ते ८ ला शिकविणार्‍या पदवीधर शिक्षकांची ५७१ पदे मंजूर असताना ३४३ पदेच भरण्यात आल्याने आजही २२८ पदे रिक्तच आहे. विशेष म्हणजे १ ते ५ ला शिकवणार्‍या १११ शिक्षकांना वर्ग ६ ते ८च्या विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. केवळ प्राथमिक शिक्षण विभागात रिक्त पदांची ही अवस्था नसून माध्यमिक विभागातही हा घोळ असण्याची शक्यता आहे. रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शिक्षण विभागात रिक्त असलेली पदे तत्काळ पदोन्नतीने भरण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी जिपचे समाजकल्याण सभापती अरविंद भालाधरे यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनातून केली.