अश्विन मुदगल नवे महापालिका आयुक्त

0
5

नागपूर,दि.23 : नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिक ा आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आयुक्त म्हणून सातारा येथील जिल्हाधिकारी अश्विन मुदगल रुजू होणार आहेत.

गेल्या अडीच वर्षांच्या हर्डीकर यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात देशभरातील स्मार्ट सिटी शहराच्या यादीत नागपूरचा समावेश करण्यात आला. या योजनेला गती मिळाली. शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी पेंच टप्पा-४ योजना राबविण्यात आली. भांडेवाडी येथील १२० एमएलडीचा सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्यात आला तसेच २०० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

नागपूरचे नवे महापालिका आयुक्त अश्विन मुदगल हे २००७ च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांनी नाशिक येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले. ते मूळचे ग्वाल्हेर येथील रहिवासी आहेत. ते सध्या सातारा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मुदगल यांनी सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत उल्लेखनीय काम केले आहे. अभिनेता अमीर खान यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वॉटर कप‘ स्पर्धेत गेल्यावर्षी (२०१६) सातारा जिल्ह्याला पहिले व दुसरे बक्षीस मिळाले. यात मुदगल यांचा सिंहाचा वाटा होता. या उपक्रमात शासकीय यंत्रणा कामाला लावून मुदगल यांनी स्वत:ही श्रमदान केले होते. त्यांच्या या कामाचे अमीर खान यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले होते. साताऱ्यात ते चांगलेच लोकप्रिय ठरले. प्रशासनावर पकड असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कोणत्याही वादापासून दूर राहून लोकहिताची कामे करण्यावर त्यांचा भर राहिलेला आहे. मुदगल यांनी यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून विदर्भातही काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.