चंद्रपूर महापौरपदासाठी आज निवडणूक

0
8

चंद्रपूर,दि.30 : चंद्रपूर शहराच्या तिसर्‍या महापौर आणि उपमहापौरपदासाठी रविवारी निवडणूक होणार असून, भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवार अंजली घोटेकर यांची केवळ औपचारिकता बाकी आहे. असे असले तरी विरोधकांची ताकद सत्ताधार्‍यांच्या तुलनेत कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी काँग्रेस आणि शहर विकास आघाडी (शविआ) नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ६६ पैकी ३६ जागा भाजपाला मिळाल्या असून, मनसे आणि अपक्षांना सोबत घेऊन ४0 नगरसेवकांचा गट तयार केला आहे. त्यामुळे भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवार अंजली घोटेकर यांची केवळ औपचारिकता तेवढी शिल्लक राहिली आहे. या निवडणुकीत ८ जागा जिंकून राजकीय वतरुळाला आश्‍चर्यचकित करणार्‍या बहुजन समाज पक्षाने महापौरपदासाठी रंजना यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अंजली घोटेकर यांचा अविरोध विजय निश्‍चितच नाही. विरोधी बाकावरून सत्ताधार्‍यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी विरोधकांना एकवटण्यासाठी महापौर निवडणूक एक संधी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे काँग्रेस आणि शहर विकास आघाडी नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.