नदीसफाई अभियानाचा झाला कचरा

0
6

नागपूर,दि.11 : दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत लोकसहभागातून नदीसफाई अभियान सुरू केले. मात्र, लोकसहभाग मिळविण्यात महापालिकेला अपयश आल्यामुळे अभियानाची पार शोभा झाली आहे. त्यामुळे अधिकारीही आता माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. अभियानाच्या उद््घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांसमोर महापौरांसह मनपातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नंतर कुणालाच फुरसत मिळाली नाही. परिणामी या सफाई अभियानाचाच पार कचरा झाला.
१७ एप्रिल ते १७ मे असा कालावधी नदीसफाई अभियानासाठी निश्‍चित करण्यात आला होता. शहरातील तीन नद्यांसह २३७ नाल्यांचीही सफाई केली जाणार होती. तीनही नद्यांकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक उपभागावर उपायुक्तांसह कार्यकारी अभियंता, सहा.आयुक्त, एक उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य अधिकारी व सफाई कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. मात्र, लोकसहभाग वाढविण्यासाठी व्यापक जनजागृतीकडे लक्ष देण्याऐवजी केवळ बैठका घेण्यातच अधिकारी व पदाधिकार्‍यांनी धन्यता मानली. नदीसफाईकरिता नासुप्र, क्रेडाई, पाटबंधारे विभाग, जिंजर मॉल, हल्दीराम, ओसीडब्ल्यू, डब्ल्यूसीएल, सार्वजनिक बांधकाम आदी शासकीय, निमशासकीय व इतर विभागाना सामावून घेण्यात आले तरीही हे अभियान यशस्वी होऊ शकले नाही.