देवरी येथे ताण-तणाव व्यवस्थापन कार्यशाळा

0
36

गोंदिया पोलिसांचा उपक्रम

देवरीसह गोंदियात ही कार्यशाळेचे आयोजन

देवरी,दि.१३- नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज खडतर सेवा करावी लागते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या जीवनात नेहमी ताणतणाव निर्माण होत असतो. या ताण-तणावाचे व्यवस्थापन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी गोंदिया पोलिस व यशदा यांच्या माध्यमातून देवरी येथे गेल्या बुधवारी (ता.१०) एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी गोंदियाच्या अधीक्षक कार्यालय आणि मुख्यालयात सुद्धा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक आफताब मंगल कार्यालयात आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील हे होते. यावेळी पुणे येथील स्ट्रेस रिलीज फाउंडेशनचे अध्यक्ष व यशदाचे मानद व्याख्याते अशोक देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे, चिचगडचे ठाणेदार  अशोक तिवारी, सहायक पोलिस निरीक्षक बाबडे आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मंथन हाल आणि मुख्यालयाच्या प्रेरणा हॉलमध्ये सुद्धा कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत, देवरी, नवेगावबांध, चिचगड, डुग्गीपारसह नक्षलभागात कार्यरत सुमारे अडीचशे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिस विभागात दैनंदिन कार्य करताना कर्मचाऱ्यांवर येणारा ताण शिवाय नक्षलग्रस्त भागात काम करताना जाणवणारा त्रास यातून अनेकदा पोलिसांचे जीवन कठीण होत असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागत असते.  कामाच्या अनियनितेमुळे जेवण आणि झोप दोघांमधील संतुलन नसल्याने पोलिसांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत असून रक्तदाब, मधुमेह आणि मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे कार्यालयातील ताणाचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होत आहे. यातून मुक्ती कशी मिळवावी, यासाठी ताण-तणाव व्यवस्थापनासंबंधी कर्मचाऱ्यांना विभागामार्फत मार्गदर्शन विभागामार्फत केले जाते. याच कळीचा भाग म्हणून देवरी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यशदाचे मानद व्याख्याते अशोक देशमुख यांनी आपल्या दिवसभराच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचाऱ्यांनी वागणे, बोलणे, व्यायाम,योग या माध्यमातून तणाव कसे कमी करायचे, याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देशमुख यांनी मानसिक तणावग्रस्त कर्मचाऱ्यांनी भूतकाळ आणि भविष्य काळातील गोष्टींवर भर न देता वर्तमानात जगणे शिकले पाहिजे असे सांगून नाते संबंधात दुरावा निर्माण होणारी परिस्थिती उत्पन्न न होऊ देण्याचा सल्ला यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना दिला.कौटुंबिक नातेसंबध आणि अधिकाऱ्यांशी नाते कसे असावे, याविषयी श्री. देशमुख यांनी उपस्थितांचे सखोल मार्गदर्शन केले
 संचलन उपनिरीक्षक गोसावी यांनी केले. पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेचा आपल्याला उत्तम लाभ झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.