भंडारा वनविभागात आढळला १ वाघ, ११ बिबट

0
11

भंडारा,दि.13 : भंडारा वनविभागात येणार्‍या एकूण १0 वनक्षेत्रातील वनांत एकूण ८७ पाणवठय़ांवर करण्यात आलेल्या वन्यप्राणी प्रगणेत १ वाघ व ११ बिबट आढळले असून २३ प्रकारच्या एकूण ३७५८ वन्यप्राण्यांची नोंद या प्रगणनेत करण्यात आली. बुध्द पौर्णिमेच्या दिवशी ही प्राणी प्रगणना करण्यात आली. यात वाघ-१, बिबट-११ चितळ ६८0, हरिण ६८, तडस-२, चौसिंगा-३, सांबर-१५३, नीलगाय-२२९, रानडुक्कर-१0२४, अस्वल- ३४, रानकुत्रे-९६, रानगवे-५, भेडकी – ३९, मोर -१६७, काळवीट – ५, ससे -२२, खोकड-२, लांडगा -३0, कोल्हा -१९, रानमांजर – ६, माकड -११६१ आणि इतर १ अशी एकूण ३७५८ प्राण्यांची नोंद करण्यात आली.

भंडारा वन विभागातील भंडारा, अड्याळ, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, जामकांद्री, लेंडेझरी व नाकाडोंगरी अशा एकूण ८७ पानवठय़ांवरील मचाणावर एक वन विभागाचा कर्मचारी व एक स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी अशा दोन व्यक्तींनी १0 मे रोजी सकाळी १२ वाजतापासून दुसर्‍या दिवशी ११ मे सकाळी १२ वाजेपयर्ंत बसून पाणवठय़ावर येणार्‍या वन्यप्राण्यांची प्रगणना केली. वन्यप्राणी प्रगणना उप वनसंरक्षक उमेश वर्मा, साहाय्यक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी पी.जी. कोडापे, साहाय्यक वनसंरक्षक मनोहर गोखले, यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक राकमल जोब, शाहीद खान यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली.