सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे काळाची गरज : पटोले

0
10

गोंदिया,दि.16 : नागरिकांची सेवा करणे हे परम कर्तव्य असून सामूहिक विवाह सोहळ्य़ांच्या माध्यमातून वेळ आणि पैसा या दोन्ही बाबीची बचत होत आहे. लग्न सोहळ्य़ांवर अनापसनाप खर्च करण्यापेक्षा सामूहिक विवाह सोहळ्य़ात लग्न करून शिल्लक राहिलेले पैसे भविष्यात कामात येतील. तेव्हा भविष्याच्या दृष्टिकोनातून सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे हे काळाची गरज असल्याचे मत गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.
ते छावा संग्राम परिषद व खा. नाना पटोले मित्र परिवाराच्या वतीने सिरपूर येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्य़ात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भाजपा नेते विनोद अग्रवाल, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केलनका, बाबा खरकाटे, संयोजक नीलम हलमारे, राजेश चतुर, सिरपूरचे सरपंच येरणे आदी उपस्थित होते. या आयोजित सामूहिक विवाह सोहळ्य़ात ४६ नवदाम्पत्य विवाहबद्ध झाले. विवाह सोहळ्य़ाच्या आयोजनासाठी संतोष शेंडे, डॉ. अनिरुद्ध बिसेन, जितेश मेंढे, संजोग रामटेके, महेंद्र घोडेश्‍वार, तंमुस अध्यक्ष सुखचंद पटले, रितेश मेंढे, यशवंत मेश्राम, तामसिंग जतपेले, दिनेशसिंह गुरबेले, संतोषसिंह बुंदेले यांनी परिश्रम घेतले.