नागपूर, अमरावतीत ‘स्वाइन फ्लू’चे सर्वाधिक रुग्ण

0
9

नागपूर,दि.20 : कडाक्याच्या उन्हातही आपले अस्तित्व कायम असल्याचे दाखविणार्‍या स्वाइन फ्लूने १ जानेवारी, २0१७ ते १८ मे, २0१७ या कालावधीत २५ जणांना मृत्यूच्या दाढेत ओढले. यात मृतकांमध्ये नागपूर जिल्ह्यातील १७ जणांचा समावेश आहे. या ‘स्वाइन फ्लू’चा सर्वाधिक जोर नागपूर, अमरावती शहरात असून गोंदिया, गडचिरोलीत एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण नसल्याचे आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पत्रकावरून निदर्शनास येत आहे.
१७ मार्च, २0१७ पासून स्वाइन फ्लूने आपला जोर दाखविण्यास सुरुवात केली. यात एक महिन्यात नागपूर शहरात १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळ्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर एप्रिलमध्ये २१ आणि १७ मेपर्यंत ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यातील मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये ६ आणि मेमध्ये ५, अशा १३ जणांचा मृत्यू झाला. नागपूर ग्रामीणमध्ये जानेवारी, फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी १, मार्चमध्ये ४, एप्रिलमध्ये ६ रुग्ण, असे १२ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यात एप्रिलमध्ये ४ आणि मेमध्ये एक अशा ४ जणांचा मृत्यू झाला. नागपूर विभागातील वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात वर्धा २, चंद्रपूर ४ आणि भंडारा येथील एका रुग्णाचा समावेश असून वर्धा आणि चंद्रपूर येथील प्रत्येक १ अशा दोघांचा समावेश आहे.