३२ कोटींच्या गैरव्यवहाराची केवळ चौकशीच !

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाखांदूर : गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे चौकशी समितीने उघड केल्यानंतरही चार वर्षांपासून संबंधित अभियंत्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. चौकशी समितीच्या अहवालानंतरही कारवाई थंडबस्त्यात पडल्याने गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठिशी घातल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केला आहे. याप्रकरणाची त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती.

गोसेखुर्द धरणासाठी केंद्र व राज्य शासनाने निधी दिला. अधिकाऱ्यांनी या योजनेवर लाखोचा निधी खर्च केला मात्र, कालव्याच्या सिमेंटचे काम निकृष्ठ दर्जाचे केले. या भ्रष्टाचाराबाबत शासनाकडे तक्रारी केल्यानंतर चौकशी समिती नेमण्यातत आली. या समितीने चौकशी करून भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित केले. तसा अहवाल शासनाला सादर केला.

गोसेखुर्द डावा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.जी. गोन्नाडे ३१ जुलै २००६ ते ८ जुलै २०१० या कालावधीत येथे कार्यरत होते. या कालावधित गोसेखुर्द डावा मुख्य कालवा कि़मी. १ ते १० व कि़मी. ११ ते २२.९३ मधील सिमेंट अस्तरीकरणाच्या कामावर खर्च झालेले ३१ कोटी ७८ लक्ष ४५ हजार २६७ रूपये व्यर्थ गेले असून ते कार्यकारी अभियंता म्हणून जबाबदार असल्याचे चौकशी अहवालात नमूद आहे. यावेळी मुख्य अभियंता सुर्यवंशी, अधिक्षक अभियंता पोहेकर, कार्यकारी अभियंता गोन्नाडे, उपविभागीय अभियंता बोधले, उपविभागीय अभियंता मानवटकर, उपविभागीय अधिकारी गांगुली, शाखा अभियंता जामकर, शाखा अभियंता सावरकर, सहा. अभियंता पुराणिक, सहा. अभियंता टेंभेकर, शाखा अभियंता दलाल, शाखा अभियंता तिबुडे, अशा १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे आदेशे तत्कालीन उप सचिव अतुल कोदे यांनी २०१० ला काढले होते.