अशोक स्तंभाच्या माध्यमातून बुध्द धम्म जगभर पोहोचला-आठवले

0
17

भिमघाट येथे अशोक स्तंभाचे लोकार्पण
गोंदिया,दि.२९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर हे सम्राट अशोकानंतरचे सर्वात मोठे धर्मांतर होते. सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर बुध्द धम्म जगभर पोहोचला. बुध्दाचे तत्वज्ञान हे विज्ञानावर त्याचबरोबर स्वातंत्र, समता आणि बंधुता यावर सुध्दा आधारित आहे. सम्राट अशोकाने जगभर विविध ठिकाणी उभारलेल्या अशोक स्तंभाच्या माध्यमातून बुध्द धम्म जगभर पोहोचला. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
गोंदिया येथील पांगोली नदी काठावरील भिमघाट येथे २८ मे रोजी आठव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण व पुरस्कार वितरण ना.आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून भंते महाथेरो डॉ.राहूल बोधी, डॉ.अशोक शिलवंत, डॉ.प्रशांत पगारे, माजी आमदार अनिल गोंडाणे, बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, भुपेश थुलकर, नगराध्यक्ष अशोक इंगळे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सदस्य सुलक्षणा शिलवंत, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, गोंदिया न.प.सभापती दिलीप गोपलानी, विनोद किराड, राजा बंसोड व रमेश टेंभरे यांची उपस्थिती होती.
श्री.आठवले पुढे म्हणाले, सम्राट अशोकांनी अनेक स्तुप निर्माण केले. त्यापैकी सांचीचा स्तुप हा एक असून तो जगप्रसिध्द आहे. डॉ.आंबेडकरांनी समतेची भूमिका मांडली. माणसाला माणसाशी जोडणारी भूमिका मांडली. डॉ.आंबेडकरांनी माणसाला माणूस बनविणारा धम्म, मनातील अहंकार संपुष्टात आणणारा धम्म, बुध्दीवादी धम्म, विज्ञानवादी धम्म अशाप्रकारच्या धम्माचा स्विकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉ.आंबेडकरांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांच्या विचारांची चळवळ चालविण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत.अशोक शिलवंत यांनी १४ पैकी आठवा अशोक स्तंभ गोंदिया येथे उभारल्याचे सांगून श्री.आठवले त्यांचे कौतुक करतांना म्हणाले,
या ठिकाणी उभे केले आहे अशोकाने स्तंभ आठ
म्हणून मी थोपाटतो तुमची पाठ.
तुम्ही उभे करा स्तंभ चौदा, पण करु नका कोणाबरोबर सौदा.
आज मी पाहिला आहे गोंदियाचा भिमघाट,
म्हणून मी लावणार आहे एक दिवस भिमाच्या दुष्मनाची वाट
तोडून जातीयतेचे बंधन, मी करतो या अशोक स्तंभाला वंदन
माझ्या हृदयात नेहमीच आहे भिमाच्या आणि बुध्दाच्या विचाराचे स्पंदन
म्हणून मी एक दिवस करणार आहे विषमतेचे रणकंदन.
वरील ओळीने उपस्थितांच्या प्रचंड टाळ्या घेतल्या. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेले होते व त्यांनी तिथे सभा घेतल्या अशा ठिकाणी हे स्तंभ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २३ एप्रिल १९५४ मध्ये या स्थळाला भेट दिली होती. परंतु अनेक वर्ष या पवित्र स्थळाचा विकास झाला नाही. राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून या भिमघाट स्मारकाच्या विकासासाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहे. अशोक शिलवंत हे देशात प्रमुख १४ ठिकाणी अशोक स्तंभ उभारत आहे. त्यांना इथे अशोक स्तंभ उभारण्याची विनंती केली असता, ती त्यांनी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांच्या विचाराला वाहून घेण्याचे काम केले. हे अशोक स्तंभ त्यांच्या विचाराच्या प्रसाराचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेवून आठव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अशोक रत्न पुरस्काराने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अशोक विभूषण पुरस्काराने सुर्तीसेन वैद्य, अनिल सुखदेवे, अजित मेश्राम, अशोक भूषण पुरस्काराने भागवत गायकवाड, अशोक बेलेकर, अशोक मित्र पुरस्काराने विश्वजीत डोंगरे, संतोष बिसेन, सुरेंद्र खोब्रागडे, संघमित्र पुरस्काराने नागाबाई पोपलवार, समता गणवीर, अशोक काव्य भूषण पुरस्काराने डॉ.नुरजहा पठाण, महेंद्र पुरस्काराने यादव मेश्राम व मिलिंद बांबोळे यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक शिलवंत यांनी केले. संचालन धनंजय वैद्य यांनी, तर उपस्थितांचे आभार श्याम चौरे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.