चंद्रपूर – मिनिमंत्रालयाने आपले संपूर्ण लक्ष्य “स्वच्छ भारत अभियाना‘वर केंद्रित केले आहे. मार्च महिन्यापर्यंत उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. अभियान राबविण्यात ग्रामसेवक, विस्तार अधिकारी फारसे उत्सुक दिसत नसल्याने अभियानाची वाटचाल मंदावली आहे. कामात हयगय करीत असल्याच्या कारणातून जिल्ह्यातील तब्बल 145 ग्रामसेवकांना मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कारणे दाखवा नोटीस पाठविल्या आहेत. यानंतरही कामात सुधारणा न झाल्यास वेतनवाढ थांबविण्याची तंबीही दिली आहे. ग्रामसेवकांना नोटीस दिल्याचा विस्तार अधिकाऱ्यांनीही धसका घेतला आहे.
औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेला चंद्रपूर जिल्हा आता हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने सोडला. मागील काही महिन्यांपासून हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांच्या बैठका, कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यातून त्यांना स्वच्छ भारत अभियानाचा डोजही अधिकाऱ्यांनी दिला. स्वच्छ भारत अभियान हे “मिशन‘ समजून सध्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गावभेटीचा धडाका सुरू केला आहे. मात्र, या धडाक्यानंतरही या अभियानाला पाहिजे तशी गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अभियानात हयगय करणाऱ्या तब्बल 145 ग्रामसेवकांना मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
स्वच्छ भारत अभियानासाठी जिल्हा परिषदेने 145 ग्रामपंचायतींची निवड केली आहे. ही गावे मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण हागणदारीमुक्त करावयाची आहेत. त्यादृष्टीने साऱ्यांचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. मात्र, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी या अभियानाबाबत फारसे गंभीर नाहीत. त्यामुळे अनेक गावांतील कामांवर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी असमाधानकारक शेरा मारून त्यांना नोटीस बजावली आहे. मार्च महिन्यापर्यंत कामात प्रगती न दाखविल्यास वेतनवाढ थांबविण्यात येणार आहे. तब्बल 145 ग्रामसेवकांना नोटीस पाठविण्यात आल्याची ही पहिलीची घटना आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांसह पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे.