साकोली : येथील तहसिल कार्यालयाची नवीन ईमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी व दुसर्या ठिकाणी सुरु असलेले बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे. हा वाद साकोली येथे अजुनही सुरुच आहे. याच संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी साकोली तहसिल कार्यालय व त्यामागे असलेल्या जागेची पाहणी केली तसेच तहसिलदार यांना संपूर्ण जागा मोजण्याचे तोंडी आदेश दिले.
साकोली येथील तहसिल कार्यालयाची नवीन ईमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती तर्फे तहसिल कार्यालयासमोर डिसेंबर महिन्यात धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर या समितीने महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी भेट घेऊ न संबंधित विषयावर चर्चा केली. तरीही गडकुंभली मार्गावर नवीन तहसिल कार्यालयाची ईमारतीचे बांधकाम सुरुच आहे.
सुरु असलेले बांधकाम थांबविण्यात यावे यासाठी समितीचे सदस्य जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊ न सदर प्रकरणावर लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकारी माधवी खोडे या स्व:त साकोली येथे येऊ न तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम व त्याला लागून असलेल्या संपूर्ण बांधकामाची पाहणी केली. तसेच संपुर्ण जागा तालुका भुमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजण्याचे आदेश तहसिलदार यांना दिले.
यावेळी माजी आमदार सेवक वाघाये, डॉ. हेमकृष्ण कापगते, हेमंत भारद्वाज, कैलाश गेडाम, मार्कंड भेंडारकर, विजय दुबे, जगदीश सुर्यवंशी, उमेश भुरे, सरपंच रामकृष्ण कोहळे, कार्यकारी अभियंता गाणार, उपविभागीय अभियंता नीनावे, शाखा अभियंता गोबाडे, उपविभागीय अधिकारी तलमले, तहसिलदार डॉ. हंसा मोहणे उपस्थित होते.