अस्वलाचा हल्ला पाच महिला जखमी

0
7

लाखांदूर ,दि.15 : तालुक्यातील मुरमाडी येथे एका पिसाळलेल्या अस्वलीने गावातील पाच महिलांना गंभीर जखमी घटना घडली असून गावातील एक म्हैस व एका शेळीला सुद्धा जखमी केल्याची माहिती आहे. तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर सदर पिसाळलेल्या अस्वलासह पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश आले. दिघोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मुरमाडी येथील तलावाशेजारी भरकटणाऱ्या तीन अस्वलांवर गावकऱ्यांनी काठीने हल्ला केल्यामुळे दोन अस्वल जंगलाच्या दिशेने निघून गेले. एका अस्वलाने गावाच्या दिशेने धुम ठोकली. गावाच्या दिशेने जाणाऱ्या अस्वलाने गावातील भिक्षुक कांबळे यांच्या शौचालयाचा आश्रय घेतला. गावात अस्वल आल्याची माहिती होताच नागरिाकंनी सदर अस्वलाच्या दिशेने मोर्चा वळविला. दरम्यान गावकऱ्यांनी अस्वलीला डिवचल्यामुळे ती सैरावैरा पळू लागली आणि वाटेत येणाऱ्या महिलांना जखमी करीत पुन्हा मारोती मेश्राम यांच्या घरात शिरून आश्रय घेतला.सदर अस्वलाच्या हल्ल्यात सत्यभामा धनराज सोनटक्के, सुगंधा पंढरी लांजेवार, कमला भागवत कांबळे, स्वीटी नानाजी कोहळे, वंदना उमेश सोनटक्के या पाच महिलांचा समावेश आहे. त्यात व्यंकट सोनटक्के यांची शेळी व टिकाराम कांबळे यांची म्हैस सुद्धा अस्वलांच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. जखमींवर लाखांदूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर वनअधिकाऱ्यांनी सदर अस्वलीला पिंजऱ्यात जेरबंद करून दहेगाव जंगलात सोडून देण्यात आले.