हिंदुस्तान नको, भारतच म्हणा-डॉ. यशवंत मनोहर

0
13

नागपूर,दि.26 : विविध जाती, पंथ, संप्रदाय, संस्कृती आणि परंपरा लाभलेल्या भारताला हिंदुस्तान नव्हे तर भारतच म्हणायला हवे. देशाबद्दल आपण वापरत असलेली परिभाषा कुणाला बळ देते आणि कुणाला दुबळे करते, हे न पाहता ती सरसकट स्वीकारणे योग्य नाही. आदिवासी या नावातच आदिम हा शब्द आहे.आदिम म्हणजे मूळ मालक आणि या मूळ मालकाचे अस्तित्वच ही परिभाषा नाकारत असेल तर आपण तिला डोक्यावर घेण्याचे काहीच कारण नाही, असे विचार ज्येष्ठ विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले. दक्षिणायन महाराष्ट्रतर्फे रविवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात आयोजित ‘आदिवासी : वास्तव आणि काव्य’वरील मुक्त चर्चेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाणे व प्रभू राजगडकर उपस्थित होते.

मराठीतील आदिवासी प्रवाहातील कवींच्या कवितांचा शोध घेणाऱ्या या कार्यक्रमात विदर्भातील आदिवासी कवींच्या कवितांचे सादरीकरण व त्या कवितांवर मुक्त चर्चा असे या उपक्रमाचे स्वरूप होते. यात सर्वप्रथम प्रभू राजगडकर यांनी ‘गोंगलू’ नावाची कविता सादर केली. ‘गोंगलूच्या डोळ्यात मी बघत होतो देश आणि तो बघत होता माझा वेश…’ या कवितेत त्यांनी आदिवासींच्या कागदावर झालेल्या काल्पनिक विकासावर कठोर प्रहार केला. प्रा. वामन शेडमाके यांनी ‘कचरागड पहाडावर सारेच कसे शांत आहे, शहरापासून लांब माझे आदिवासी गाव आहे’ या कवितेद्वारे संविधान बदलायला निघालेल्या व्यवस्थेवर आसूड ओढला. सुरेंद्र मसराम यांनी ‘शब्दांनो मी तुमचा मोहताज नाही, माझ्या कवितेचे तुम्ही साज नाही’ ही गजलेच्या वाटेने जाणारी कविता सादर केली. लटारू कवडू मडावी यांच्या ‘मी मडावी गडचिरोलीच्या जंगलातून बोलतो’ या शीर्षकाच्या कवितेने गडचिरोलीच्या निबीड अरण्यात पोलीस आणि नक्षल्यांच्या द्वंद्वात तिथला सामान्य आदिवासी कसा पिचला जातोय, याचे दाहक वास्तव मांडले. राजेंद्र मरसकोल्हे, नीलकांत कुलसंगे व उषाकिरण आत्राम यांच्या कवितांनीही श्रोत्यांना अंतर्मुख केले. या सर्व कवितांवर श्रोत्यांनी आपली निरीक्षणे नोंदविली. कार्यक्रमाचे संचालन सुनील इंदूवामन ठाकरे यांनी केले.