पेट्रोलचोरीत भाजपाचा पदाधिकारीही

0
5

नागपूर,दि.27 : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नवनीतसिंग तुली या भाजपा पदाधिकाऱ्याच्या पेट्रोलपंपावर छापा टाकून दोन मशिन्स सील केले.इंडियन आॅईल कंपनीचा मानकापुरातील ‘रबज्योत आॅटोमोबाईल्स’ हा पेट्रोल पंप नवनीतसिंग तुली यांच्या मालकीचा आहे. पेट्रोलपंपावर इलेक्ट्रॉनिक मायक्रोचीप बसवून ती रिमोटद्वारे संचालित करीत ग्राहकांची फसवणूक करणारी टोळी ठाणे पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आपल्या चार सहकाऱ्यांसह सोमवारी तुलीच्या पेट्रोल पंपावर धडकले. त्यांनी पंपाची तपासणी केली. येथे मायक्रोचीपच्या आधारे पेट्रोल चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील दोन मशिन्स सील केल्या.तुली यांनी भाजपच्या तिकीटावर नुकतीच महापालिकेची निवडणुकही लढविली आहे.

विशेष म्हणजे, ज्या विभागाची या गोरखधंद्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे, त्या वैधमापन शास्त्र विभागाला या कारवाईपासून पोलिसांनी दूर ठेवले आहे. हा विभागच पेट्रोल पंपावर मोजमाप व्यवस्थित आहे की नाही, त्या संबंधाचे प्रमाणपत्र देत असतो. परिणामी पेट्रोल चोरी करणारांवर कारवाई करण्याचा अधिकार असणाऱ्या अधिकाऱ्यांचे बुरखे फाटले आहे. अनेक पंपांवर पेट्रोल कमी मिळत असल्याच्या शेकडो ग्राहकांच्या नियमित तक्रारी आहेत. मात्र, त्याची दखलच घेतली जात नाही. कारवाईचा दबाव वाढल्यास तपासणीचा फार्स होतो. त्यामुळे पेट्रोल चोरीच्या या गोरखधंद्यात कारवाई करणारांचेही हात गुंतले असल्याचा आरोप होऊ लागला आहे. परिणामी या विभागाचे अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डोंबीवली (मुंबई) तील विवेक शेट्टी आणि पिंपरी चिंचवड येथील अविनाश नाईक यांच्या डोक्यातून पेट्रोल चोरीच्या गोरखधंद्याची क्लृप्ती निघाली अन् नंतर हा गोरखधंदा देशभरात सुरू झाला. एका सॉफ्टवेअर कंपनीत टेक्नीशियन असलेल्या नाईकला केवळ २० ते २२ हजार पगार मिळायचा. त्याने पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरी करणारी चीप तयार केली. त्याचा प्रारंभीक प्रयोग शेट्टीच्या माध्यमातून मुंबईतील काही पेट्रोलपंपावर झाला. महिन्याला विनादिक्कत लाखो रुपये पदरात पडत असल्याचे पाहून हपापलेले अनेक पेट्रोल पंप संचालक या गोरखधंद्यात सहभागी झाले. मुंबईनंतर राज्यातील अनेक भागात अन् त्यानंतर उत्तरप्रदेशासह देशातील विविध प्रांतात हा गोरखधंदा फळलाफुलला. सारख्या तक्रारी मिळत असल्यामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यराज यांनी या गोरखधंद्याचे मुळ शोधण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. त्यानंतर उघड झालेल्या या गोरखधंद्याची व्याप्ती शोधण्यासाठी यूपी विशेष तपास पथक निर्माण करण्यात आले. अनेकांना अटक झाली त्यातूनच या गोरखधंद्याचे सूत्रधार विवेक शेट्टी आणि अविनाश नाईक असल्याचे पुढे आले. विशेष तपास पथकाने त्यांची गचांडी पकडून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रानिक्स चिप, रिमोट सेंसर, लॅपटॉप आणि अन्य चिजवस्तू जप्त केल्या. या दोघांच्या अटकेतून ठाणे पोलिसांचे लक्ष वेधले गेले. त्यांनीही शेट्टी-नाईकच्या टोळीतील अनेकांना जेरबंद केले. त्यानंतर ठाणे, मुंबई, नागपूरसह विविध शहरात हा गोरखधंदा बिनबोभाट सुरू असल्याचे पुढे आले. नागपुरातील मानकापूर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावरही हा गोरखधंदा सुरू असल्याचे सांगितल्याचे समजते. या माहितीच्या आधारे ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आपल्या चार सहकाऱ्यांसह सोमवारी मानकापुरातील नवनीतसिंग तुली यांच्या पेट्रोल पंपावर धडकले. त्यांनी पंपाची तपासणी केली. येथे मायक्रोचीपच्या आधारे पेट्रोल चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील दोन मशिन्स सील केल्या.