उड्डाणपुल भूमिपूजनाच्या कोनशिलेची अंत्ययात्रा काढणार-व्यास

0
8

लाखनी,दि.27 : लाखनी शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण पाच वर्षापूर्वी पूर्ण झाले. चौपदरीकरणामुळे लाखनी शहरात अपघात वाढले. अशोक बिल्डकॉनने लाखनीच्या जनतेच्या सुरक्षिततेची हमी देत रस्त्याचे काम पूर्ण केले. परंतु हा महामार्ग हा लाखनीवासीयासाठी यमदुत ठरला आहे. लाखनी शहरातून उड्डानपुलाची मागणी असताना दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु वर्षभरानंतरही उड्डाण पुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे भूमिपूजनाच्या कोनशिलेची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा लाखनी न.प.चे उपाध्यक्ष धनु व्यास यांनी दिला.

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर शंभराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. अनेकांवर गंभीर जखमी होण्याची वेळ आली. लाखनीत अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. लाखनीतील चौक धोकादायक ठरत आहेत. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नाही. गतिरोधक नाही. त्यामुळे थोड्याशा चुकीमुळे किंवा जड वाहनांच्या सदोष चालविण्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

अपघात होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. समर्थनगरच्या मैदानात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे मागीलवर्षी विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कोट्यावधी रूपयांची कामे केंद्र सरकारने मंजूर केली आहेत? परंतु प्रत्यक्षात कामाला विलंब होत असल्याने शहरातील लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याठिकाणी केवळ भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे कोनशिलेची अंत्ययात्रा काढणार असल्याचे व्यास यांनी म्हटले आहे.

लाखनी शहरात परिसरातील अनेक गावातून लोक येत असतात. शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते अशा या गजबजलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असतात. रस्त्यावर अवैधरीत्या वाहने उभी असतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. परंतु याकडे कुणाही लोकप्रतिनिधीचे लक्ष जात नसल्यामुळे त्यांच्याविरूद्ध लाखनीवासीयांमध्ये असंतोष पसरला आहे.