कर्मचाऱ्यांअभावी महसूलाची कामे खोळंबली

0
15

सालेकसा,दि.01 : महसूल विभागात वाढता कामाचा बोजा असतानाच तहसीलदारांकडे नगर पंचायतचे प्रशासक म्हणून अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. त्यावर तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची सतत गैरहजेरीमुळे कामांचा बोझवारा उडाला आहे.तहसील कार्यालय हा तालुक्याच्या एक सर्वात महत्वाचा विभाग असून सामान्य जनतेपासून प्रत्येक घटकाशी निगडीत महसूल विभाग कामाच्या दृष्टीकोनातून फारच महत्वाचा आहे. येथील तहसील कार्यालयासाठी एक तहसीलदारासह चार नायब तहसीलदारांचे पद मंजूर आहे. यात निवडणूक विभागातील नायब तहसीलदारांचे पद रिक्त आहे. बाकी तीन पैकी संजय गांधी निराधार विभागाशी संबंधीत नायब तहसीलदार डी.के.बारसे देवरी येथे समायोजनावर पाठविण्यात आले आहेत.सामान्य प्रशासनातील नायब तहसीलदार एस.एन.बारसागडे कार्यरत आहेत. परंतु ते नेहमी बेपत्ता राहत असून कोणत्या न कोणत्या कारणाने रजेवर असतात.दुसरे नायब तहसीलदार एस.जी.खाडे चार महिन्यांपूर्वी येथे रुजू झाले. परंतु सुरुवातीचे काही दिवस कार्यालयात हजर राहिल्यानंतर मार्च महिन्यापासून सतत सुटीवर आहेत. त्यामुळे संबंधीत विभागाची कामे खोळंबली असून काही महत्वाच्या व नियमित कामाचा ताण तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या डोक्यावर वाढला आहे. त्यांना अनेक कामे सकाळ पासून उशीरा रात्रीपर्यंत कार्यालयात बसून करावी लागत आहेत.

त्याशिवाय साप्ताहिक मासीक बैठका घेणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांत हजेरी लावणे तसेच नैसर्गिक-अनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची कामे हाताळणे इत्यादी आकस्मिक कामे केव्हा आणि कोणत्या वेळी येऊन ठेपतील याबाबत सांगता येत नाही. अशात सर्व नायब तहसीलदारांनी लापरवाहीने कर्तव्य बजावणे किती योग्य आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची पदे सुद्धा रिक्त असल्याने अनेक कामे वेळेवर होताना दिसत नाही. यात अव्वल कारकूनचे तीन पद मंजूर असून त्यात एक पद रिक्त आहे. कनिष्ठ लिपीकाची सात पदे मंजूर असून त्यातील तीन पदे रिक्त आहेत. या व्यतिरीक्त इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेत एक पद, संजय गांधी निराधार योजनेत एक पद, पुरवठा विभागात एक पद, शिपाई एक पद रिक्त आहे. अशी एकूण आठ पदे रिक्त असून याचा थेट फटका दैनंदिन कामकाजावर पडत आहे.सध्या विद्यार्थ्यांची वरच्या वर्गासाठी किंवा व्यवसायीक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी धावपळ सुरु असून विविध प्रमाणपत्रांसाठी त्यांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. परंतु त्यांची कामे वेळेवर होताना दिसत नाही.