जि.प.ची २.२५ हेक्टर जमीन अतिक्रमणात

0
9

आमगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २.५ हेक्टर आर जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. काही पुढाऱ्यांनी तर या जमिनीवर अवैधपणे व्यापार संकुलच बनवून घेतले. परंतु या अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून रस्त्यालगत दुकान थाटून उपजिविका चालवणाऱ्यांवर बुलडोजर चालविण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडल्यामुळे ही अतिक्रमण हटाव कारवाई ‘दिव्याखाली अंधार’ असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

आमगाव तालुक्यात आमगाव ग्रामपंचायत व बनगाव ग्रामपंचायतच्या सिमेवर जिल्हा परिषदेच्या मालकीची २.२५ हेक्टर आर.जमीन आहे. या जमिनीवर आठवडी बाजाराचा लिलाव जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येतो. ही जागा काही राजकीय पुढाऱ्यांनी हस्तगत करुन अनधिकृतपणे त्यावर व्यापार संकुल बांधकाम करण्यात आले. या बांधकामाची रितसर तक्रार ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेकडे केली. तसेच अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. परंतु जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी या अवैध बांधकामावर पांघरून घालण्याचे प्रयत्न केल्याने सलग दोन वर्षे पूर्ण होऊनही जिल्हा परिषदेच्या जमिनीवर अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या जमिनींवर अतिक्रमणाला अधिक वाव मिळाला.

अनेक व्यक्तींनी या जमिनीवर पक्के बांधकाम करुन इमारती उभारल्या आहेत. व्यापार संकुल बांधकाम करताना पुढाऱ्यांनी आपले हित जोपासण्यासाठी अवैध बांधकामाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे बांधकाम झालेल्या व्यापारी गाळ्यात इतरांनी अवैधपणे आपली मालकी दाखवून गाळे हस्तगत केले आहेत. परंतु जिल्हा परिषदेने त्याची कोणतीच दखल घेतली नाही. कोट्यवधीची जमीन खासगी अतिक्रमणात जाताना जिल्हा परिषद गप्प का? हा संशोधनाचा विषय आहे.