शेतकऱ्यांनो ! मुली व पत्नीचे नाव सातबारावर नोंदवा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
11

गोंदिया,दि.२६ : जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग राबतांना दिसतो. घरच्या पशुधनाची काळजी घेण्यासोबतच जंगलातून तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम सुध्दा महिला मोठ्या प्रमाणात करतांना दिसतात. दुर्दैवाने शेतीत, गोठ्यात व जंगलात काम करीत असतांना जर सर्पदंश होवून महिलेचा मृत्यू झाला तर त्या महिलेच्या वारसांना कोणत्याही अपघात विमा योजनेचा लाभ मिळत नाही. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना अपघात विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आता शेतीच्या सातबारावर आपल्या मुलींचे, पत्नीचे व आईचे नाव नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
वयाच्या १० ते ७५ वर्षापर्यंत अपघात विमा योजनेचा लाभ संबंधित महिलेच्या वारसांना मिळू शकतो. माहेरी किंवा सासरी सर्पदंशाने मृत्यू झाल्यास अपघात विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळू शकते. येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत किंवा त्यापूर्वी आपली मुलगी, पत्नी व आई यांची नावे सहहिस्सेदार म्हणून सातबारावर लावण्यासाठी गावच्या तलाठ्याकडे किंवा आपले सरकार या वेबपोर्टलवर अर्ज करावा. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांशी याबाबत संपर्क साधावा.