लेखन शैलीत बदल घडविण्याचे सार्मथ्य-शंकर बडे

0
22

भंडारा : साहित्य, पुस्तके, कादंबर्‍या, कविता संग्रह या भेटवस्तू म्हणून देण्याची चुकीची पद्धत साहित्यीकांनी सुरु केली आहे. साहित्यीकांनी हा प्रकार बंद करून प्रामाणिक लेखन शैलीत दमदार लेखन करून वाचकांमध्ये बदल घडविण्याची ताकद निर्माण करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शंकर बडे यांनी केले.
येथील श्रीगणेश शाळेच्या प्रांगणात आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान मुंबई, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले तर अतिथी म्हणून आ.अँड.रामचंद्र अवसरे, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्‍चंद्र बोरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) के.झेड. शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, पद्माकर मोघे, लॉयन्स क्लबचे ज्ञानेश्‍वर वांदिले उपस्थित होते. ग्रंथोत्सवाचे उद््घाटन शंकर बडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथोत्सवात दुर्मिळ ग्रंथ, साहित्य ग्रंथ व अन्य पुस्तकांची विक्री करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. खासदार पटोले म्हणाले, विदर्भात साहित्यिक, कवी, बुद्धीजीवींची संख्या कमी नाही.मात्र विदर्भातील साहित्यिकांना पाठय़पुस्तकात स्थान मिळत नाही. विदर्भातील साहित्यिक मागे राहू नये यासाठी साहित्य अकादमी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अवसरे यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी तर संचालन प्रा.सुमंत देशपांडे व नितीन कारेमोरे यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी शेंडे यांनी मानले. ग्रंथोत्सवाच्या विधीवत उद््घाटनापूर्वी सकाळी प्रकाश हायस्कुल ते गणेश हायस्कुल पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. यावेळी उपस्थित अतिथी व विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. पालखीवर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करुन स्वागत केले. भजन पथक गं्रंथदिंडीचे आकर्षण ठरले.