अंतिम पैसेवारी ८९ पैसे

0
16

गोंदिया : यावर्षी कमी पावसामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धानाला योग्य भाव किंवा बोनस मिळाला नाही. त्यातच आता अंतिम पैसेवारीही ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी शासनाच्या कोणत्याही मदतीचा किंवा सवलतींचा लाभ मिळणार नाही.
जिल्हा प्रशासनाने दि.१४ ला अंतिम पैसेवारीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे सादर केला. त्यात सडक अर्जुनी तालुक्यातील पिंडकेपार आणि म्हसवानी ही केवळ दोन गावे उत्पन्नाच्या बाबतीत ५० पैशांपेक्षा कमी आहेत. उर्वरित ९१९ गावांमधील उत्पन्न ५० पैशांपेक्षा जास्त, अर्थात सरासरी ८९ पैसे आहे. शासनाच्या अहवालानुसार पिकांच्या सर्वाधिक चांगली स्थिती गोंदिया तालुक्ताय (१.११ पैसे) तर सर्वात वाईट परिस्थिती गोरेगाव तालुक्यात (०.६३ पैसे) आहे.गेल्यावर्षी अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची चिंता यावर्षी कमी पावसामुळे वाढली.
पिकांची परिस्थिती गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली असली तरी गेल्यावर्षीप्रमाणे धानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस यावर्षी मिळाला नाही. त्यातच उत्पादन खर्च वाढला असताना हमीभावात केवळ ५० रुपयांची वाढ यावर्षी झाल्यामुळे शेतकरी समाधानी नाहीत. त्यामुळे धान उत्पादकांसाठी शासनाने विशेष पॅकेज द्यावे अशीही मागणी जोर धरत आहे.