रिसामातील देशी दारु दुकान हटविण्यासाठी महिलांचे आंदोलन सुरु

0
15
आमगाव(पराग कटरे),दि.08- आमगाव नगरपंचायतीच्या व पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या रिसामा येथील दिनेश कटकवार यांच्या देशी दारु दुकानाला बंद करण्याच्या मागणीला घेऊन येथील महिलांनी कंबर कसली आहे.महिलांनी चक्क देशी दारु दुकानासमोरच दुकान बंद करण्यासाठी गुरुवार(दि.7)पासून पंचायत समिती सदस्या छबू उके यांच्या नेतृत्वात तृप्ती बहेकार,हेमलता पागोटे,दुलनबाई चुटे,निर्मला पागोटे व इंदुबाई ब्राम्हणकर यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.एकीकडे महिलांची दारु दुकान बंद करण्याची मागणी दुसरीकडे नगरपंचायतीच्या भविष्यातील निवडणुका लक्षात घेता काही राजकारणी नेत्यांची मात्र चांगलीच अडचण या आंदोलनामुळे झाली आहे. रिसामा गावातील मुख्य चौकात दिनेश कटकवार यांच्या मालकीची देशी दारू दुकान असून चौक परिसरातच शाळा व मंदिर आहे.गावातला हा मुख्य मार्ग असल्याने ये जा करतांना महिलांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पोलीसांसह जिल्हाधिकारी यांना अाधीच केली होती.तत्कालीन ग्रामपंचायतीने दुकान स्थलांतर करण्याचा ठराव सुध्दा पोलीस विभागाला दिला होता.तरीही देखील कटकवार यांनी दुकान न हटविल्याने गावातील  महिलांनी दिनेश कटकवार यांच्या दारू दुकानासमोरच आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. जो पर्यंत दुकान हटणार नाही,तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली आहे.