केंद्र शासनाचा स्वच्छ शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
14
मुंबई, दि. 8 :  केंद्र शासनाने दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. त्या अभियानाचा भाग म्हणूनच मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून देशातील सर्व शाळांसाठी सन 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. आता सन 2017-18 यावर्षासाठी देशातील शाळांकडून स्वच्छ विदयालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सन 206-17  मध्ये राज्यातील 15 शाळांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ विदयालय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी मार्गदर्शक सूचना आणि शाळांसाठी नामनिर्देशन करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाकडून MARD च्या संकेतस्थळावर तसेच स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपवर उपलब्ध करण्यात आली आहे.
सदर पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर 100 शाळा, राज्य पातळीवर 40 शाळा आणि जिल्हा पातळीवर 48 शाळा यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराकरिता अर्ज करणाऱ्या शाळांनी अपलोड केलेल्या प्रस्तावातील माहितीची प्रत्यक्ष पडताळणी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून करण्यात येईल. पुरस्काराकरिता शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा 5 क्षेत्रांमध्ये एकूण 39 घटक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून त्यांना श्रेणी देण्यात येणार आहे.
या निकषामध्ये 90 ते 100 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना हिरवा रंग, पाच श्रेणी आणि अत्युत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. 75 ते 89 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना निळा रंग, चार श्रेणी आणि उत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. 51 ते 74 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना पिवळा रंग, तीन श्रेणी आणि उत्तम पंरतु सुधारणेस वाव असा शेरा दिला जाणार आहे. 35 ते 50 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना नारंगी रंग, दोन श्रेणी आणि ठीक – सुधारणेची गरज असा शेरा दिला जाणार आहे. तर 35 टक्के पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या शाळांना लाल रंग, एक श्रेणी आणि सुधारणेची अत्यंतिक गरज असा शेरा दिला जाणार आहे.
या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर, 2017 ही कालमर्यादा देण्यात आली आहे. 31  ऑक्टोबर  2017 पूर्वी पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे. या पुरस्कारासाठी शाळांना अर्ज करताना शाळेचा असलेला युडायस क्रंमाक नोंदवून लॉगीन करता येते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समित्या नियुक्त कण्यात आल्या आहेत.
स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर तसेच स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध प्रश्नावली नुसार सर्व शाळांनी याकरिता अर्ज करता येईल. हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येईल.
शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा, तसेच सर्व रोगांपासून मुक्त अशा निरामय व आनंदी जीवनाचा लाभ व्हावा, यासाठी
‘स्वच्छ-विद्यालय- स्वच्छ- महाराष्ट्र’ मोहिम कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गतच सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.  या पुरस्काराबाबतच्या मार्गदर्शन सूचना, शाळांसाठी नामनिर्देशन करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाकडून मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर तसेच ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे.  सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201709071536323221  असा आहे.