नोटाबंदीने अर्थव्यवस्थेवर परिणाम-डाॅ.श्रीनिवास खांदेवाले

0
15

भंडारा,दि.11 : कोणत्याही अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत न करता प्रधानमंत्र्यांनी अचानक घोषित केलेली नोटाबंदी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारी आणि अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारी घटना आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.
स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्रांच्या अध्ययन मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ‘नोटाबंदी आणि रोजगार’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. कार्तिक पणिक्कर होते. याप्रसंगी डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. ज्ञानेश्वर कडव, डॉ. अनिल भांडारकर, डॉ. दीपक राऊत उपस्थित होते.
डॉ. खांदेवाले म्हणाले, नोटाबंदी करताना सरकारने घोषित केलेले काळापैसा बाहेर काढणे, आतंकवादाला संपविणे आणि अर्थव्यवस्थेचे डीजीटलायजेशन यापैकी कोणतेही उद्दिष्ट प्राप्त केले नाहीच, परंतु त्याशिवाय अनौपचारिक क्षेत्राला पूर्णपणे ध्वस्त केले. त्यामुळे लहान उद्योग आणि गृहोद्योग बंद पडून अनेक श्रमिकांचे रोजगार हिरावले. नोटांच्या अभावाने अनेक छोटे उद्योग बंद झाल्यामुळे त्यांची कर्जाच्या परतफेडीची क्षमता कमी झाली आणि बँकांपुढे या उद्योगांना दिलेल्या कर्जाच्या बुडण्याची नवी समस्या उभी राहिली. कर्जाच्या परतफेडीच्या समस्येने बँकांच्या अस्तित्वावर नवीन संकटे आलेली आहेत, त्यामुळे त्यातून स्वत:ला सावरण्यासाठी बँका ग्राहकांच्या खिश्यात हात टाकत आहेत.
भारताचा बाजार डीजीटलायजेशनसाठी अद्याप तयार नसल्यामुळे ‘पेटीएम’सारख्या खासगी कंपन्या कमिशनच्या माध्यमातून ग्राहकांना लुटत आहेत. सरकारच्या रोजगार धोरणाची समीक्षा करताना ते म्हणाल, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले हे सरकार मात्र तीन वर्षात केवळ सव्वा लाखच रोजगार निर्माण करू शकले. डॉ. खांदेवाले यांनी नोटाबंदीमुळे घडून आलेल्या परिणामाचे अर्थशास्त्रीय विश्लेषण करून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांची गंभीर शास्त्रशुद्ध चर्चा करताना त्यांनी उपस्थित श्रोत्यांना हे निदर्शनास आणून दिले कि नोटाबंदी घोषित झाल्यावर त्याचे श्रेय घेणारे अभ्यासक आणि कथित अर्थसल्लागार आता मात्र कुठेही बोलताना किंवा आपले मत व्यक्त करताना दिसत नाहीत.
प्रास्ताविक अध्ययन मंडळाचे समन्वयक डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांनी केले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. कार्तिक पणिक्कर होते. त्यांनी आजच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या अध्ययनाचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, सामाजिक शास्त्रांच्या अध्ययनाला त्याच्या समाजातील उपयोगितेची जोड दिल्याशिवाय समाजाची दिशा आणि दशा आपल्याला निश्चित करता येणार नाही. या देशातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाबींच्या सकारात्मक परिवर्तनासाठी सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनी आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संचालन सुषुप्ती काळबांधे व गायत्री हिरापुरे यांनी केले.