वीज बिल न भरल्यामुळे कोदामेडी ग्रामपंचायतीचे मीटर जप्त

0
8

सडक अर्जुनी,दि.11- बिलाची रक्कम न भरल्यामुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी ग्रामपंचायत कार्यालयाचे मीटर वीज कंपनीने जप्त केले.असाच प्रकार घडत राहीला तर त्यामुळे ग्रामपंचायत डिजिटल करण्याचा शासनाचा उद्देश कसा पूर्ण होईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे काेदामेडी हे गाव राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचे आहे.
मागील पाच महिन्यांपासून कोदामेडी ग्रामपंचायतीवर २ हजार २८० रूपयांचे बिल होते. फक्त एवढीच रक्कम भरणे गरजेचे होते. वीज वितरण कंपनीच्या संबंधित शाखा कार्यालयाकडून वारंवार सूचना दिल्यानंतर देखील सूचनांचे पालन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले नाही. तसेच बिल भरण्यास अनियमितता दर्शविल्यामुळे अखेर वीज वितरण कंपनीला नाईलाजास्तव कारवाई करून वीज मीटर जप्त करावे लागले.
प्रधानमंत्री मोदी हे देशातील सर्वच ग्रामपंचायतींना डिजिटल करण्याचे स्वप्न बघत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार आता ग्रामपंचायतींमध्येच सर्वच दाखले आॅनलाईन पध्दतीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय जेथे ही सुविधा नाही त्या ग्रामपंचायतच्या संगणकावर सर्वच दाखले ग्रामस्थांना प्राप्त होतील, अशी सोयसुद्धा केली जात आहे. आता जी कर्जमाफी शासनाच्यावतीने करण्यात आली, त्यासाठी अर्जदेखील ग्रामपंचायतीमध्येच आॅनलाईन पध्दतीने भरावयाचे आहे.
परंतु जर एखादी ग्रामपंचायत वीज बिल भरत नसेल व त्या ग्रामपंचायतचे मीटर जप्त होत असेल तर ती आॅनलाईन सुविधा लोकांच्या काय कामाची? व लोकांच्या आॅनलाईन कामाचे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.शासनाच्यावतीने ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी देण्यात येतो. पण ग्रामपंचायत पाच महिन्यांमध्ये फक्त २ हजार २८० रूपयांचे वीज देयक भरु शकत नसेल तर देशाच्या डिजिटल भारताच्या स्वप्नाचे काय होईल. शिवाय गावाची प्रमुख असलेली ग्रामपंचायतच असे करीत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.कोदामेडी ग्रामपंचायतच्यावतीने विकासाचे मोठमोठे दावे केले जातात. पण साधे बिल न भरल्यामुळे वीज कंपनीच्या कर्मचाºयांनी सरळ-सरळ मीटरच काढून नेल्याने ग्रामपंचायतचे विकासाचे सगळे दावे पोकळ असल्याचे दिसून येते.

कोदामेडी ग्रामपंचायतवर गेल्या पाच महिन्यांपासून बिल थकीत होते. ग्रामपंचायतला वारंवार सूचना देऊनही बिल भरण्यात आले नाही. ग्रामपंचायतच असे करीत असेल तर गावातील सामान्य नागरिकांवर काय प्रभाव पडेल. त्यामुळे नाईलाजास्तव मीटर काढण्यात आले.
-राजू मानकर,
सहायक वीज अभियंता, सडक-अर्जुनी