हेलिकॉप्टर बनविणारी रशियन कंपनी मिहानमध्ये?

0
13

नागपूर : हेलिकॉप्टरचे सुटे भाग तयार करणारी जगप्रसिद्ध रशियन कंपनी मिहानमध्ये यावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात शासकीय पातळीवर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मिहान हा राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पांत जगातील मोठमोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ही रशियन कंपनी मिहानमध्ये यावी या दृष्टीने गडकरी यांनी अलीकडेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दिल्ली येथे चर्चा केली. या चर्चेनंतर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नागपूरला येऊन गेले. त्यांनी मिहानला भेट दिली. याबाबत गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. मुख्यमंत्री जागतिक आर्थिक परिषदेसाठी डाओस (स्वित्झर्लंड) येथे गेले आहेत. तेथून परतल्यानंतर त्यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक ठरली आहे. ही कंपनी मिहानमध्ये येणे नागपूरसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून याला मोठे महत्त्व आहे. कंपनीत जागतिकस्तरावरील तंत्रज्ञ येतील. यामुळे नागपूरच्या औद्योगिक विकासाचा वेग जागतिक पटलावरही वाढेल, असा विश्वास आहे.