सेजगाव उपसरपंचपदाची निवडणूक अविरोध

0
10
गोदिया,दि.14 : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी कंठीलाल पारधी हे निवडून आले होते. तसेच त्यांच्या पक्षाच्या इतर सहा जागा मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले होते. १२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत स्वप्निल महाजन यांची अविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, सत्तापक्षातील एका सदस्याने आपल्याला उपसरपंच पद मिळावे यासाठी खुप आटापिटा केल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते.
सेजगाव ग्रामपंचायतमध्ये ९ सदस्य असून सरपंच गटाचे सहा सदस्य तर विरोधी गटाचे तीन सदस्य निवडून आले. अशातच तिसर्यांदा ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडून आलेल्या पुस्तकला पटले यांनी उपसरपंच पद मिळावे अशी गळ घातली होती. मात्र, त्याला दाद न देता सरपंच पारधी तसेच पं.स. सदस्य डॉ. किशोर पारधी यांनी पहिल्यांदाच निवडून आलेल्या स्वप्निल महाजन यांना पसंती दिली. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर या प्रकरणाला घेवून चांगलेच वातावरण तापले होते. निवडणूक प्रक्रिया अध्याशी अधिकारी गुणवंत ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी त्रिलोकनाथ पारधी, स्वप्निल महाजन, पुस्तकला पटले यांनी अर्ज सादर केले होते. परंतु, मुदतीच्या आत त्रिलोक पारधी व पुस्तकला पटले यांनी नामांकन अर्ज परत घेतल्याने महाजन यांनी अविरोध निवड झाली. निवडणुकीनंतर सरपंच व उपसरपंचाच्या समर्थकांनी जल्लोष केला.