25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ सिकलसेलग्रस्तांचा तारणहार संपत रामटेके यांचे निधन

सिकलसेलग्रस्तांचा तारणहार संपत रामटेके यांचे निधन

0
28

नागपूर,दि.16ः- आयुष्यातील चाळीस वर्षे गरीबांचा आजार असलेल्या सिकलसेलग्रस्तांना न्याय देण्यासाठी लढणारे संपत तुकाराम रामटेके यांचे गुरुवारी (दि. 15) निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. मोक्षधाम घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यातील जन्मस्थळ असलेल्या महादवाडीपासून त्यांनी सुरू केलेली सिकलसेलविरुद्धची लढाई त्यांनी देशाच्या संसदेत पोहोचवली. एवढ्यावरच रामटेके यांनी सिकलसेलविरुद्धची लढाई थांबविली नाही; तर संयुक्त राष्ट्रसंघात त्यांनी सिकलसेल आजार पोहोचवला. वेस्टर्न कोल फिल्ड येथे अधीक्षक अभियंता पदावर असताना त्यांच्या कार्याची दखल घेत 2007 मध्ये वेकोलिने सिकलसेलग्रस्तांसाठी केलेला त्याग आणि संघर्ष लक्षात घेता पद्‌मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या शिफारस केली होती. परंतु हा बहुमान त्यांना मिळाला नाही. मात्र, प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमिर खान यांनी रामटेकेंच्या कार्याची दखल घेऊन “सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात सिकलसेल आजारातील लढावू वृत्तीचे रामटेके यांना सहभागी करून घेतले होते.

सिकलसेल आजारासंदर्भात जनजागृतीसह सिकलसेलग्रस्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकाकी लढणारा कार्यकर्ता म्हणून संपत रामटेके यांची देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली होती. नगरसेवकापासून तर राष्ट्रपती यांच्यापर्यंत रामटेके यांनी सिकलसेलग्रस्ताना उपचारासह विविध सवलती उपलब्ध करून देण्याचा लढा सुरु केला. यामुळेच महाराष्ट्र शासनाने मेयोत सिकलसेल संशोधन केंद्र, मोफत उपचार, गरीब सिकलसेलग्रस्तांना 600 रुपये मासिक मानधन, 10 आणि 12 वीच्या सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्याना 20 मिनिटं अधिकचा वेळ, मेडिकलमध्ये सिकलसेल डे केअर सेंटर, मोफत गर्भजल परिक्षण, मोफत एसटी पास, राष्ट्रीय सेवा योजनेत सिकलसेलचा समावेश बालधोरणातही सिकलसेलचा समावेश करण्यासाठी ते लढले.