ना.बडोलेंच्या हस्ते चक्रीवादळ बाधितांना धनादेश वाटप

0
52

गोरेगाव,दि.१८ : यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. अलिकडेच धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे दुष्काळाची स्थिती व दुसरीकडे तुडतुड्याचे संकट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गोरेगाव तालुक्यातील तेढा येथे १७ नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालय गोरेगावच्या वतीने चक्रीवादळामुळे बाधित आपदग्रस्तांना धनादेशाचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, जि.प.सदस्य ज्योती वालदे, जि.प.माजी समाजकल्याण समिती सभापती कुसन घासले, संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट,तेढा सरपंच रत्नकला भेंडारकर, उपसरपंच डॉ.विवेक शेंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.सदस्य ज्योती वालदे व सरपंच रत्नकला भेंडारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गोरेगाव तालुक्यातील ११६५ घरांचे एप्रिल व मे २०१६ मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून त्यासाठी ३१ लक्ष ६ हजार ५० रुपये निधी उपलब्ध झाला आहे. बाधितांना धनादेशाचे वाटप उर्वरित गावात सुध्दा करण्यात येणार आहे. तेढा येथील १६१ घरांचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून १६८ कुटूंबांना ५ लक्ष १५ हजार रुपये धनादेशाचे वितरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाधितांना करण्यात आले.तेढा व बाधित गावातील रामचंद्र भेंडारकर, छबीलाल अंबादे, सुमन टेंभूर्णेकर, डिगांबर खरोले, शांताबाई आस्वले, पुरणलाल पटले, छबीलाल पटले, बाबुलाल मेश्राम, हिरामन पटले, भागीरथा पंचभाई, देवलाबाई घासले, पार्बताबाई राऊत, रामचंद्र राऊत, बिजू भंडारी, झेलनबाई कोहळे, नंदलाल गाथे, दुलीचंद राऊत, प्रेमलाल वरकडे, अशोक पटले आदी बाधितांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. तेढा ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.