ठाणेगाव ग्रामपंचायतीच्या मतमोजणीचा मार्ग मोकळा

0
11

तिरोडा,दि.02ः-तालुक्यातील ठाणेगाव येथे ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात आली. मात्र, सरपंच पदाच्या एका उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी ही निवडणूक रद्द ठरविली होती. दरम्यान येथील सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने निवडणूक झाल्यानंतरही मजमोजणी करू नये असे आदेश दिले होते. त्यामुळे मतमोजणी करण्यात आली नव्हती. तेव्हा तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर ३0 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने अपीलकर्त्या महिलेच्या बाजूने निर्णय देत लवकरात लवकर ठाणेगाव येथील मतमोजणी करण्यात यावी, असा आदेश दिला.
तिरोडा तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीपैकी बोरगाव ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यांची अविरोध निवड झाल्यामुळे तेथे निवडणूक न होता. ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यात येऊन १६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ठाणेगाव ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली नव्हती. ठाणेगाव येथील सरपंचपदाकरीता सर्वसाधारण महिला पदाचे आरक्षण होते. ज्याकरीता येथील अनिता अरुण रहांगडाले यांच्यासह दोन उमेदवारांनी अर्ज भरले होते. यात अनिता रहांगडाले यांना तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज रद्द करावा, असा आक्षेप घेतल्यावरून निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांचा अर्ज रद्द ठरविला होता.
त्याविरोधात रहांगडाले यांनी नागपूर उच्च न्यायालयात अपील केल्यावरून उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज कायम ठेवून निवडणुका घेण्यात याव्या, असा आदेश दिल्यावरून १६ ऑक्टोबर रोजी येथील निवडणूक झाली होती. मात्र, १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतमोजणीत न्यायालयाच्या आदेशामुळे ठाणेगाव येथील सर्व सदस्य व सरपंच पदाची मतमोजणी करण्यात आली नव्हती. त्यावर काल ३0 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालय नागपूर येथे यावर सुनावणी होवून अनिता अरुण रहांगडाले यांचा निवडणूक अर्ज वैध असून ठाणेगाव येथील सदस्य व सरपंच पदाचे मतमोजणी लवकरात लवकर करावी. असा आदेश काढल्याने मागील ४४ दिवसांपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथे ठाणेगाव येथील बॅलेट मशीन कडेकोट पोलिस बंदोबस्तात सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नजरेखाली ठेवल्या असून न्यायालयाच्या निर्णयामुळे येथील मतमोजणी लवकरच होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.