26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ उच्चशिक्षित प्रकल्पग्रस्ताची विरूगिरी

उच्चशिक्षित प्रकल्पग्रस्ताची विरूगिरी

0
27

भंडारा,दि.14ःःगोसेखुर्द धरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी, या मागणीसाठी लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज येथील उच्चशिक्षित प्रकल्पग्रस्ताने बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निंबाच्या झाडावर चढून विरूगिरी केली. अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु, जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले.
विनोद दागोजी ढोरे रा. सरांडी बुज, असे या प्रकल्पग्रस्ताचे नाव आहे. विनोदचे शिक्षण एम.ए., एम. फिल. असून त्याची वडिलोपाजिर्त शेती गोसे धरणासाठी संपादीत करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे विस्थापित झाल्याने आपल्याला शासकीय नोकरी मिळावी, यासाठी त्याने शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु, त्याच्या पदरी निराशाच आली.
अखेरीस बुधवारी सकाळी विनोद हा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. कार्यालयाच्या बाजुला असलेल्या निंबाच्या झाडावर तो चढला. त्याने सोबत पेट्रोल भरलेल्या दोन बाटला घेतल्या होत्या. तो आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली. त्यामुळे तातडीने पोलिस ताफा दाखल झाला. पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर हे सुद्धा उपस्थित झाले. अधिकार्‍यांनी विनोदची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरले. अखेरीस जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे स्वत: तिथे आले. त्यांनी विनोदची समजूत काढत चर्चाकरून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर विनोद झाडाखाली उतरला.
जिल्हाधिकारी दिवसे यांनी आपल्या कक्षात विनोदसोबत सुमारे अर्धा तास चर्चा केली. सदर मागण्यांवर पुन्हा चर्चा करून तोडगा काढू, असे आश्‍वासन दिल्याने विनोद ढोरे गावाकडे परतला.