काँग्रेसच्या नेतृत्वात भिसी येथे बैलबंडी मोर्चा

0
10

चिमूर दि.१६–: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता काँग्रेसच्या नेतृत्वात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर भिसी बायपासवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी एकही वरिष्ठ अधिकारी न आल्याने आंदोलनकर्त्यांनी निवेदन देण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भिसी, वाढोणा येथे वनविभागाने मंजूर केलेल्या जाळीच्या कुंपनाच्या निविदा पुनश्च काढण्यात याव्या, जंगली जनावरांपासून होणारी शेतीची नुकसान भरपाई नुकसानीच्या तुलनेत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव व अधिकचा ५० टक्के नफा देण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात यावा, कृषिपंपाची डिमांड भरताच एक महिन्याच्या आत वीज जोडणी झालीच पाहिजे, गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा जलसिंचन कालव्याच्या दुरूस्तीसह बांधकाम पूर्ण करावे, शेतमजुरांना शेतीसाठी शासकीय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, वनडेपोत बांबु व लाकडांचा पुरवठा नियमित उपलब्ध करून देण्यात यावा, भिसी परिसरातील चिंचोली सावर्ला, डोंगर्ला, जांभूळहिरा, नवेगाव, पुयारदंड, गडपिपरी, सिरसपूर, शिवरा, लावारी इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेती जंगलालगत असल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांची जंगली जनावरे नासधूस करीत असतात. त्यामुळे सदर गावांच्या सभोवताल काटेरी कुंपन करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. सदर आंदोलनात जि.प.चे काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजुकरांसह शेतकरी शंभरावर बैलबंडी घेऊन सहभागी झाले होते.