नगरपालिका कर्मचार्‍यांसाठी आजपासून आरोग्य शिबिर

0
8

गोंदिया,दि.23ः- येथील नगर परिषद प्रशासन व सहयोग हॉस्पीटल सुपर मल्टीस्पेशलिटीच्या वतीने नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांसाठी स्थानिक नगर परिषद टाऊन शाळेत तीन दिवसीय नि:शुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन आज २३ डिसेंबर रोजी पासून करण्यात आले असून हे शिबीर विशेषत: नगर परिषदेच्या सफाई कर्मचार्‍यांना लक्षात ठेवून आयोजित करण्यात आल्याची माहिती नपचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी पत्र परिषदेच्या माध्यमातून दिली.
नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांना कामाच्या वाढत्या व्यापामुळे स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. तर अनेकदा त्यांना कुटुंबीयांनाही वेळ देण्यात अडचणी येतात. त्यातच सफाई कामगारांची अतियश दयनिय अवस्था राहत असून सफाई करतेवेळी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे सफाई करण्यासाठी त्यांना घाणीतही जावे लागते अशावेळी त्यांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता असते. दरम्यान त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी नगर परिषदेकडून यंदाच्या वर्षीपासून नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान या वर्षी येत्या २३ डिसेंबर पासून २५ डिसेंबरपर्यंत असे तीन दिवस हे आरोग्य शिबीार घेण्यात येणार आहे. यात लाभार्थ्यांचे अनेक आजार, ईसीजी. मधूमेह तपासणी, रक्तदाब, हृदय रोग आदी आजारांची तपासणी करून त्यावर उपचार करण्यात येणार आहे. या शिबीरात नगर परिषदेचे २७२ सफाई कर्मचारी त्यांचे कुटूंबीय व इतर कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय असे सुमारे ७00 ते ८00 जणांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
नगर परिषदेचे अध्यक्ष अशोक इंगळे व उपाध्यक्ष शिव शर्मा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या शिबीराचे उद््घाटन करण्यात येणार असून डॉ. राजेंद्र वैद्य, डॉ. सुमित पिसे, डॉ. अनुप अग्रवाल, डॉ. संजय माहुले, डॉ. अंकिता अग्रवाल, डॉ. बि.डी. जायस्वाल, डॉ. मोहित गजभिये, डॉ. तृप्ती कटरे, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. विवेक लंजे हे सेवा देणार आहेत.
यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, नगर पालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, सहयोग हॉस्पीटलचे एच. ओ. विलास वासनिक उपस्थित होते.