घरटॅक्समध्ये होणार कपात-नगराध्यक्ष मेंढे

0
7

भंडारा,दि.27ः-भंडारा नगर परिषदेने सर्व मालमत्ता धारकांना दुप्पट घरकर वाढवून दिलेला ताण आता कमी होण्याची चिन्हे आहेत. घरकरामध्ये झालेल्या वाढीनंतर जनाक्रोश उसळल्याने सरसकट १0 ते १५ टक्के कर कमी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भंडारा नगर परिषदेमार्फत सन २0१७-१८ ते सन २0२0-२१ या चतुर्थ वार्षिक करआकारणी करण्याकरिता शहरातील नागरिकांना महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९ नुसार वाढीव घर टॅक्सची नोटीस पाठविण्यात आली होती. या वाढीव घरकरावर आक्षेप मागविण्यात आले होते. तथापि, नोटीसमध्ये प्रचंड घरकर वाढविण्यात आल्याने नागरिकांचा आक्रोश वाढला होता. विविध ठिकाणी आंदोलनही करण्यात आले. आक्षेप घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत शहरातील ३ हजार ७३३ नागरिकांनी घरटॅक्स कमी करण्यासाठी आक्षेप नोंदणी केली होती. दरम्यान, प्रस्तावित केलेली वाढीव करआकारणी अंतिम करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेऊन करआकारणीबाबत चर्चा केली. चर्चेअंती सरसकट १0 ते १५ टक्के कर कमी करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार घरकराचे अंतिम मागणी देयक नागरिकांना पाठविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शहरातील सर्वच नागरिकांवर पडणारा वाढीव घरकराचा बोजा कमी होणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले.