ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लिंगभेद करून कामाची समानता नाकारली

0
20

चंद्रपूर ,दि.४ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडसोबत लिंगभेद करून कामाची समानता नाकारणाऱ्या मुख्य वनसरंक्षकांसह उपवनसंरक्षक व आदिवासी ग्रामविकास पर्यटक मार्गदर्शक व वन्यप्राणी संरक्षण समिती अध्यक्षाविरुद्ध महिला गाईडने दूर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली. सदर मुख्य वनसंरक्षकांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही तक्रारीत केली आहे.कामाच्या ठिकाणी महिला-पुरूष असा भेदभाव करता येत नाही. भारतीय संविधानाचे अनुच्छेद १४ नुसार लिंगभेद करता येत नाही. परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडना काम देताना महिला-पुरूष असा भेदभाव करून कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही तक्रारीतून केली आहे.
महिला गाईड म्हणून काम करताना या कामात आधीपासून असलेल्या पुरूष गाईडनी महिला गाईडना सन्मानाची व समानतेची वागणूक दिली नाही. या महिलांचा अपमान होईल, अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी बोलणे व वागणे सुरू केले.याबाबत त्याचवेळी भद्रावती पोलिसात तक्रार केली होती. तत्कालीन ठाणेदार यांनी याची दखल घेत पुरुष गाईडना याबाबत तंबी दिली होती. तरीही महिला गाईडना पुरूष गाईडसारखी वागणूक व कामे न दिल्याने या असमानतेबाबत १९ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्य वनसरंक्षक कार्यालयाला लेखी पत्र दिले आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर वारंवार या कार्यालयाशी व उपसंचालक (कोअर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.उपसंचालक मानकर यांनी याबाबीची गंभीर दखल घेत असल्याचे सांगून आश्वस्त केले होते व पुरूष गाईडप्रमाणेच महिला गाईडनाही कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही, अशी माहिती अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिली.