ना.बडोलेंच्या समर्थकांनी दिली मारण्याची धमकी-शुध्दोधन शहारे

0
10
गोंदिया,दि.05ः- भीमा कोरेगाव येथील घटनेला घेऊन 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार गोंदियातही सर्व पुराेगामी संघटना व राजकीय पक्षाच्यावतीने बंदचे आवाहन केले गेले होते.या दरम्यान येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ निषेध सभा घेण्यात आली.या निषेध सभेत बोलतांना प्रबुध्द विनायतकारी संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शुध्दोध्दन शहारे यांनी राज्यसरकारसह राज्याचे मुख्यमंत्री,सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याविरोधात नारेबाजी केली.या नारेबाजीचा राग मनात घेऊन येथीलच भाजपचे पदाधिकारी व ना.बडोले यांचे पीए धनजंय वैद्य,रतन वासनिक,बसंत गणवीर,श्याम चौरे व अजित मेश्राम यांनी 3 जानेवारीच्या रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी आपल्या घरी येऊन जिवे मारण्याची धमकी देत शिविगाळ केल्याची तक्रार शुध्दाेदन शहारे यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात 4 जानेवारीला नोंदविली.त्या घटनेची माहिती देण्यासाठी आज पत्रकारपरिषद घेत आपल्या घरी दारुच्या नशेत येऊन जिवे मारण्याची धमकी देणारे हे ना.राजकुमार बडोले यांचे समर्थक असून त्यांच्याच इशार्यावर आपल्याला मारण्यासाठी आल्याचा आरोप शुध्दोदन शहारे यांनी केला.सोबतच ज्यांच्याविरुध्द आपण तक्रार नोंदविली आहे.त्यांच्याविरुध्द पोलिसांनी 3 दिवसाच्या आत कारवाई न केल्यास आंदोलनात्मक इशारा सुध्दा दिला आहे.शहारे यांनी सांगितले की.धनजंय वैद्य,अजित मेश्राम,रतन वासनिक,श्याम चौरे व बसंत गणवीर यांनी माझ्या घरी येण्यापुर्वी बडोले यांच्या कार्यालयात दारु घेतली.त्यानंतर मी घरी एकटाच असल्याचे पाहून आले.घरात येताच शिविगाळ केली तसेच वैद्य हे दोनदा मारण्यासाठी अंगावर धावून आले.मला भिती वाटल्याने मी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी माझ्या घरातील सभांषण एैकून पोलीस गाडी पाठविली.पोलिस येताच हे सर्व बाहेर गेले मात्र पुन्हा बडोले साहेबांचे नाव घेतला तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले व तक्रार दाखल केल्याचा सांगितले.गोंदिया ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात दखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.मात्र आपल्या जिवाला धोका असल्याचे शहारे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला एच.आर.लाडे,सतिश बनसोड,अतुल सतदेवे,राजेश मेश्राम,डाॅ.राऊत,निशा गणवीर,ओंकार बनसोड,विलास राऊत,निधी शहारे,प्रकाश बागे,महेश माधवानी,अपुर्व अग्रवाल,गौरव जांभुलकर,कुणाल राऊत,श्रीकांत जांभुलकर,शुभम गजभिये आदी उपस्थित होते.
दरम्यान गोंदियाचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर तसेच त्यांच्या स्वीय सहायकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कुणीही प्रतिसाद न दिल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.